Chandrapur Congress | काँग्रेसमध्ये सत्ता संघर्ष शिगेला; १६ नगरसेवकांसह धानोरकरांचा गटनेतेपदावर मजबूत दावा

राजेश अडूर यांच्या नेतृत्वाला आव्हान; व्हिप, अपात्रतेचे इशारे आणि शक्तिप्रदर्शन
Chandrapur Municipal Corporation
Chandrapur Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

Chandrapur Municipal Corporation Congress Internal Conflict

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसमधील अंतर्गत सत्तासंघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून खासदार प्रतिभा धानोरकर यांनी २७ पैकी १६ नगरसेवकांना एकत्र आणत विद्यमान गटनेते राजेश अडूर यांच्या नेतृत्वालाच थेट आव्हान दिले आहे. गेल्या दोन दिवसांपासून लेटर बॉम्ब, व्हिप, अपात्रतेचे इशारे आणि नगरसेवकांच्या शक्तिप्रदर्शनामुळे तापलेले राजकीय वातावरण आजच्या बैठकीनंतर आणखी ढवळून निघाले आहे. या घडामोडींमुळे काँग्रेसमधील धानोरकर-वडेट्टीवार संघर्ष पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून सध्या धानोरकर गटाने राजकीय आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे.

चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसमध्ये गेल्या काही महिन्यांपासून खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्या समर्थकांमध्ये सुरू असलेला संघर्ष आता उघड बंडापर्यंत पोहोचला आहे. गटनेते बदलण्यासाठी धानोरकर समर्थक नगरसेवकांनी १५ जून रोजी विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीत विद्यमान गटनेते राजेश अडूर यांना पदावरून दूर करून नवीन गटनेत्याची निवड करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला.

Chandrapur Municipal Corporation
Chandrapur Theft | खांबाडा उपबाजारातील गोदाम फोडून सरकीची ८० पोती चोरीला; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

या हालचालींना प्रत्युत्तर म्हणून राजेश अडूर यांनी १४ जून रोजी तातडीची बैठक बोलावून नगरसेवकांना व्हिप जारी केला होता. या बैठकीला वडेट्टीवार समर्थक ११ नगरसेवक उपस्थित राहिले. मात्र धानोरकर समर्थक १६ नगरसेवकांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. त्यामुळे काँग्रेसमधील दोन गटांमधील संघर्ष अधिकच तीव्र झाल्याचे स्पष्ट झाले.

गेल्या काही दिवसांपासून नगरसेवकांच्या निवासस्थानी बैठकीच्या नोटिसा चिकटविणे, विविध पत्रव्यवहार, व्हिप बजावणे आणि अपात्रतेचे इशारे देणे अशा घटनांमुळे काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. कोणत्या गटासोबत राहायचे याबाबत अनेक नगरसेवक द्विधा मनःस्थितीत असल्याची चर्चा होती. मात्र आज झालेल्या बैठकीत १६ नगरसेवक उपस्थित राहिल्याने धानोरकर गटाकडे स्पष्ट बहुमत असल्याचा दावा अधिक बळकट झाला आहे.

Chandrapur Municipal Corporation
Chandrapur Congress Politics | गटनेता बदलासाठी काँग्रेस नगरसेवकांचे पर्यटन; धानोरकर-वडेट्टीवार संघर्ष पुन्हा पेटला

विशेष म्हणजे, गटनेते निवडीच्या वेळी धानोरकर गटाकडे अवघे दहा नगरसेवक होते. त्याचा फायदा घेत वडेट्टीवार समर्थकांनी राजेश अडूर यांना गटनेतेपदी विराजमान केले होते. मात्र गेल्या काही महिन्यांत नेतृत्वशैली आणि पक्षातील निर्णयप्रक्रियेबाबत वाढलेल्या नाराजीमुळे काही नगरसेवकांनी भूमिका बदलत धानोरकर गटाची साथ दिली. त्यामुळे काँग्रेसमधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.

आज झालेल्या बैठकीत नवीन गटनेता निवडीसंदर्भातील निवेदन तयार करण्यात आले असून सर्व १६ नगरसेवक लवकरच नागपूर येथे विभागीय आयुक्तांकडे अधिकृत दावा सादर करणार असल्याची माहिती समोर आली आहे. गटनेतेपदावरील बदलासह पक्षाच्या संघटनात्मक रचनेत आणि प्रतिनिधित्वात बदल करण्याचाही प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सांगितले जात आहे.

Chandrapur Municipal Corporation
Chandrapur Crime News | वरोरा पोलिसांची कारवाई; सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक करणारी टोळी जेरबंद

चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसचे दोन प्रभावशाली नेते आमनेसामने आल्याने पक्षातील अंतर्गत फूट आता स्पष्टपणे समोर आली आहे. स्थायी समितीच्या नियुक्त्या, महापौर निवडणूक, सत्ताधारी पक्षनेतेपदाचा दावा आणि विविध राजकीय नियुक्त्यांवरून सुरू झालेला वाद आता थेट नेतृत्वबदलापर्यंत पोहोचला आहे.

राजकीय जाणकारांच्या मते, हा संघर्ष वेळेत मिटला नाही तर त्याचा परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर होऊ शकतो. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात सुरू असलेली ही गटबाजी पक्षासाठी चिंतेची बाब मानली जात आहे. त्यामुळे हा वाद केवळ गटनेतेपदापुरता मर्यादित राहिलेला नसून जिल्ह्यातील काँग्रेसच्या भविष्यातील राजकीय वाटचालीशी जोडला गेला आहे.

Chandrapur Municipal Corporation
Chandrapur News | जागतिक योग स्पर्धा २०२६ मध्ये डॉ. पूजा देऊरकर; सुवर्णपदकाची मानकरी

सध्या १६ नगरसेवकांचे संख्याबळ आपल्या बाजूला असल्याचा दावा करत धानोरकर गटाने गटनेतेपदावर मजबूत हक्क सांगितला आहे. आता विभागीय आयुक्त कार्यालय आणि पक्षश्रेष्ठी या प्रकरणात काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मात्र या संघर्षामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून त्याचे दूरगामी राजकीय परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news