

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा वन्यप्राण्यांच्या धुमाकुळाने खळबळ उडवली आहे. शहरालगतच्या जुनोना येथे शनिवारी (दि.२३) अस्वलाने बाप-लेकावर जीवघेणा हल्ला केला. या घटनेत वडील अरुण कुकसे (६५) आणि त्यांचा मुलगा विजय कुकसे गंभीर जखमी झाले असून दोघांवरही उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चंद्रपूर जिल्हा हा वन्यजीवांनी समृद्ध असला तरी गेल्या काही वर्षांपासून मानव-वन्यजीव संघर्षाची प्रकरणे सतत घडत आहेत. जंगलांचे आकुंचन, खाणकाम, रस्ते बांधणी व वस्ती विस्तार यामुळे प्राण्यांना नैसर्गिक अधिवासातून विस्थापित व्हावे लागत आहे. परिणामी हे प्राणी अन्न व पाण्याच्या शोधात गावात व वसाहतींमध्ये शिरू लागले आहेत. जुनोना येथील शनिवारीची घटना या समस्येचे भयावह रूप ठरली. शनिवारी दुपारी जुनोना येथील बेघर भागात अस्वलाने अचानक हल्ला चढवला. यात ६५ वर्षीय अरुण कुकसे व त्यांचा मुलगा विजय गंभीर जखमी झाले. अरुण कुकसे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले, तर विजय याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गावकऱ्यांनी धैर्य दाखवत एकत्र येत दगडफेक व काठ्यांच्या साहाय्याने अस्वलाला पिटाळून लावले. मात्र या दरम्यान अस्वलही गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली व परिस्थिती नियंत्रणात आणली.
या मोहिमेत हॅबिटॅट कंझर्वेशन सोसायटीचे दिनेश खातें, वनविकास महामंडळाचे कदम, जुनोना वनपरिक्षेत्र अधिकारी मेश्राम, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन पोडसेलवार आणि वनपरिक्षेत्र अधिकारी घोरपडे यांनी विशेष भूमिका बजावली. गंभीर जखमी अस्वलाला ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये नेऊन उपचार सुरू आहेत. वैद्यकीय पथक सतत त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवत आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये प्रचंड चिंता व संताप व्यक्त होत आहे. त्यांचे म्हणणे आहे की अशा घटना दिवसेंदिवस वाढत असून ग्रामीणांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.