चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या राजकारणात उलथापालथ करून शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या पक्षातून चाळीस आमदार बाहेर पडले. राज्यात राजकीय भूकंप आल्याने महाविकास आघाडीच्या सत्तेचे सत्तांतर झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून शिवसेनेप्रमाणेच अजित पवार वेगळे झाले. सध्या राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. परंतू जे आमदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडून गेले, त्यांना आता तेथे राहणे कठीण झाले आहे. त्यामुळे चाळीसपैकी बारा आमदार पुन्हा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वाटेवर असल्याचा खळबळजनक दावा ॲड.असीम सरोदे यांनी केला आहे.
चंद्रपूर शहरात गुरूवारी (दि.१४) 'निर्भय बनो' ची सभा पार पडली, त्यामध्ये प्रमुख वक्ते म्हणून बोलत असताना ॲड. सरोदे यांनी हा दावा केला आहे. श्रीनिवास वनगा, लता सोनोने, महेंद्र दळवी, प्रकाश सर्वे, बालाजी कल्याणकर, चिमणराव पाटील, नितीनकुमार तळे, प्रदीप जैस्वाल, उदयसिंह राजपूत, महेश शिंदे, प्रकाश आबिटकर यांचा या बाराजणांमध्ये समावेश आहे. सोडून गेलेल्या आमदारांना आता कळून चुकले आहे, की आता या माणसांसोबत आपले ठीक नाही, असेही ते यावेळी म्हणाले.
तसेच राष्ट्रवादीचे अनेकजण परत येणार, अशी माहिती येत असल्याचेही ॲड सरोदे यांनी सांगितले. आता उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांनी ठरविले पाहिजे की, एकदा विकला गेलेला नेता, पुन्हा परत घेतला जाणार नाही. जर त्यांनी ठरविले नाही तर आम्ही मतदार ठरवू , असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
हेही वाचा :