चंद्रपूर : देवघाटावर अवैधरित्या मुरूमाची चोरी; १२ हायवा ट्रकपैकी फक्‍त ५ ट्रकवर कारवाई | पुढारी

चंद्रपूर : देवघाटावर अवैधरित्या मुरूमाची चोरी; १२ हायवा ट्रकपैकी फक्‍त ५ ट्रकवर कारवाई

चंद्रपूर ; पुढारी वृत्‍तसेवा गौण खनिजाची अवै्दयरित्या चोरी करून मालामाल होण्याची जणू स्पर्धा सुरू असल्‍याचे दिसून येत आहे. रॉयल्टी कमीची आणि उत्खनन जास्तीचे असा फंडा वापरून शासनाचा सर्रास महसुल बुडवून व्यवसायीक मालामाल होत आहेत. काल शुक्रवारी रात्री साडेकराच्या सुमारास जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील देवघाटावर नाल्यावर अवैद्यरित्‍या मुरुमाची चोरी होत असताना पोलिस व महसल विभागाने धाड टाकली. या संयुक्त कारवाईत 12 हायवा ट्रक पकडण्यात आले. त्यापैकी गौण खनिजाने भरलेले पाच हायवा ट्रकांवरच पोलिस विभागाने कारवाई केली आहे. पोलिस अधिक्षक ममुका सुदर्शन यांच्या निर्देशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

या विषयी अधिक माहितीनुसार, वर्षभरापासून राजुरा – गोविंदपूर (353 बी) या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या बांधकामाचे कंत्राट जीआरआयएल (gril) या कंपनीला मिळाले आहे. रस्ता तयार करण्याकरीता कंपनीला गौण खनिजाची म्हणजे मुरुम माती व रेतीची आवश्यकता आहे. गौण खनिजाला कोरपना तालुक्यातील अमलानाला, देवघाटनाला, पकडीगुड्डम आदी ठिकाणावरून काढण्याची परवानगी प्रशासनाने दिली आहे. मात्र कंपनीने परवानगी पेक्षा अतिरिक्त गौण खनिजाचे उत्खनन करून बारमाही वाहणारे जिवंत नाले पोखरून काढले आहेत. संबंधीत विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे हा प्रकार वाढल्याने गौण खनिज तस्करांचे फावत आहे. चोरी प्रकरणात अनेक तक्रारी झाल्या, परंतु प्रशासनाने छोट्या छोट्या कारवाईचा फार्स दाखविला. दबावापोटी कारवाईला ठेंगा दाखविल्याने गौण खनिजाची तस्करी सर्रास सुरूच आहे.

नव्यानेच रूजू झालेले पोलीस अधिक्षक ममुका सुदर्शन यांना तक्रारी प्राप्त होताच त्यांनी पोलिस व महसूल विभाला कारवाई करण्याचे निर्देश दिले. पोलिस अधिक्षकांच्या निर्देशानुसार काल (शुक्रवार) पोलिस व महसूल विभागाने कोरपना तालुक्यातील देवघाट नाल्यावर मुरूमाची तस्करी होत असताना धाड टाकली. या कारवाईत 12 हायवा ट्रक घटणास्थळी पकडण्यात आले.

राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाकरीता जीआरआयएल कंपनीला नाल्यावरून मुरुम माती उत्खननाला परवानगी मार्च 24 पर्यंत मिळालेली आहे. या कालावधीत कंपनीला 53 हजार ब्रासचे उत्खनन करायचे होते. परंतु वाजवीपेक्षाही जास्तीचे उत्खनन करून नालाच पोखरून टाकला आहे. 53 हजाराच्या ऐवजी लाखों ब्रास अवैद्यरित्या दिवस-रात्र उत्खनन करण्यात आले आहे. मंजुरी नुसार 30 सप्टेबर पर्यंतच 52 हजार 500 ब्रास उत्खनन झाले आहे. त्यानंतरही मागील चार महिण्यांपासून 24 तास गौण खनिजाचे उत्खनन करून शासनाच्या महसुलाला चुना लावण्यात आला आहे. रात्री गौण खनिजाची वाहतूक करता येत नाही परंतू अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हा वाहतुकीचा गोरखधंदा दिवस रात्र सुरूच आहे.

पोलिस अधिक्षकांच्या निर्देशानंतर काल शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तहसिलदार व्हटकर व ठाणेदार एकाडे यांनी कोरपणा तालुक्यातील देवघाट नाल्यावर ताफ्यासह धाड टाकली. घटनास्थळावर पोकलेन व हाड्रा मशीन तसेच वाहतूक होत असलेले 12 हायवा आढळून आले. त्यापैकी गौण खनिजाने भरलेल्‍या 5 हायवावरच कारवाई करण्यात आली आहे. उर्वरित खाली हायवा व मशीन सोडून देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यापूर्वी परिक्षाविधिन अधिकारी रणजीत यादव यांनी कारवाईचे धाडस दाखविले होते. त्यानंतर पोलिस अधीक्षक सुदर्शन यांच्या आदेशानंतर कारवाई झाली आहे. मात्र खाली हायवा आणि उत्खनन करणारे मशीन का सोडून देण्यात आले असा प्रश्न विचारला जात आहे.

कोरपना तालुक्यात पाणी टंचाईची शक्यता

राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाकरीता वाजवी पेक्षा जास्तीचे गौण खनिजाचे अवैध उत्खनन होत असल्याने नाले पोखरून काढण्यात आले आहे. यामध्ये शासनाच्या महसुलाला तर चुना लागलाच आहे. परंतु कृत्रीम पाणी टंचाईचा सामना उत्खनन होत असलेल्या परिसरातील गावांना करावा लागणार आहे. उत्खननामुळे नाल्यामध्ये मोठ मोठे खड्डे तयार झाले आहेत. त्यामुळे काही गावात पाणी टंचाईला सुरूवात झाली आहे. याकरीता जबाबदार कोण ? असा प्रश्न नागरीकांना पडला आहे.

हेही वाचा : 

Back to top button