चंद्रपूर : वाघाची रानगव्याशी झुंज; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल | पुढारी

चंद्रपूर : वाघाची रानगव्याशी झुंज; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : आठवडाभरापूर्वी ताडोबातील बेलारा बफर झोनमध्ये दोन वाघांच्या झुंजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ही घटना ताजी असतानाच आज रविवारी (दि.१८) पुन्हा एका झुंजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. पण ही झुंज दोन वाघांमध्ये नव्हे तर एका वाघाची आणि रानगव्याची आहे. रानगव्याच्या ताकतीसमोर वाघाला जीव मुठीत घेऊन पळ काढावा लागला.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाघांमधील झुंजीचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर हायरल झाले आहेत. आठवडाभरापूर्वी ताडोबा व्याघ्र प्रकल्पात बेलारा बफर झोनमध्ये दोन वाघांमध्ये झुंज लागली होती. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. आज ताडोबातील एका रानगव्यासोबत वाघाच्या झुंजीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील मोहूर्ली येथील पाणवठ्यावर काल शनिवारी (दि.१७) रानगवा हा पाणी पिण्यासाठी आला होता. त्याच पाणवठ्याजवळ छोटा दडीयल नावाचा वाघ शिकारीच्या शोधत दबा धरुन बसला होता. रानगवा पाणी पीत असतानाच वाघाने शिकार साधण्याचा कोणताही डाव वाया न घालवता पाणवठ्यातच हल्ला केला. रानगव्यावर हल्ला करून शिकार टिपत असतानाच कळपातील अल्फा नावाच्या रानगव्याला हे दृश्य दिसले. आपलाच सहकारी संकटातच असल्यामूळे अल्फा नावाचा रानगवा मदतीसाठी धावून आला. अल्फा हा रानगवा बलाढ्य असल्याने जबड्यातील रानगव्याला सोडून स्वतःचा जीव वाचविण्यासाठी छोटा दडियल नावाच्या वाघाला पळ काढावा लागला. हा संपूर्ण घटनक्रम चंद्रपूर शहरातील वन्यजीव प्रेमी भूषण थेरे यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपला. त्यानंतर काही वेळातच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

हेही वाचा :

Back to top button