चंद्रपूर ; चणा कापणीसाठी गेलेल्‍या महिलांच्या गाडीचा अपघात; ३ महिला कामगार ठार, १४ गंभीर जखमी | पुढारी

चंद्रपूर ; चणा कापणीसाठी गेलेल्‍या महिलांच्या गाडीचा अपघात; ३ महिला कामगार ठार, १४ गंभीर जखमी

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा ब्रम्हपूरी शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या माहेर या गावातून वर्धा जिल्ह्यात चणा कापणीसाठी गेलेल्या १७ महिला सुमो गाडीतून काम आटोपून परतत असताना, उमरेड तालुक्यातील सिर्सीजवळ काल (गुरुवार) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास वाहन उलटून अपघात झाला. यामध्ये तीन महिला कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तर चालकासह १४ महिला गंभीर जखमी झाल्या.

ब्रह्मपुरी शहराजवळील माहेर येथील १७ महिला गेल्या काही दिवसांपासून वर्धा जिल्ह्यात चणा कापणीसाठी जात होत्या. याकरीता महिलांनी सुमो वाहन भाड्याने घेतले होते. ते वाहन महिला कामगारांना दररोज ने आण करीत होते. काल गुरूवारी चालकाने माहेर गावातून पहाटेला १७ महिलांना सुमो वाहनात बसवून पिंपरी गावी चना कापणीला घेऊन गेला होता. दिवसभर चणा कापणीच्या कामानंतर सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास उमरेड तालुक्यातील सिर्शी जवळ परत येत असताना महिलांचे वाहन उलटून गंभीर अपघात झाला. अपघातामध्ये रत्नमाला मेश्राम, इंदिरा महाजन, रसिका बागडे या महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर तनवी विनोद मेश्राम, दुर्गा विजय आडकिने, संगीता देविदास आडकिने, वीणा विक्रांत अडकिने, सोनाबाई सिद्धके, संध्या संतोष बागडे, सरिता विजय नागापुरे, मनोरथा शांताराम मेश्राम, राजश्री राजेश्वर मेश्राम, बेबी ईश्वर मेश्राम, जनाबाई अर्जुन बावणे, अश्विनी अरविंद बागडे या महिलांसह वाहन चालक शंकर प्रभाकर मसराम (वय३०) रा. जांभुळघाट गंभीर जखमी झाला.

घटनेची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश वारजुकर यांनी घटनास्थळ गाठून मदत कार्याला सुरुवात केली. एका रुग्णवाहिकेतून तीन महिलांचे शव उमरेड येथे पाठविण्यात आले. उर्वरित जखमींना चार रुग्णवाहिकांमधून नागपूर येथे हलविण्यात आले. स्वतः सतीश वारजुकर जखमींसोबत नागपूरला गेले आहेत. घटनेने माहेर गावात शोककळा पसरली आहे.

हेही वाचा : 

Back to top button