Pakistan election results 2024 | पाकिस्तान निवडणूक- नवाझ शरीफ यांनी लाहोर जिंकले, इम्रान खान यांच्या समर्थकांचा पराभव | पुढारी

Pakistan election results 2024 | पाकिस्तान निवडणूक- नवाझ शरीफ यांनी लाहोर जिंकले, इम्रान खान यांच्या समर्थकांचा पराभव

पुढारी ऑनलाईन : पाकिस्तानमध्ये नॅशनल असेंब्ली निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान पार पडले होते. दरम्यान, हाती आलेल्या निकालानुसार, लाहोरमधून नवाझ शरीफ यांनी निवडणूक जिंकली आहे. पाकिस्तानच्या जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, मियां मुहम्मद नवाझ शरीफ १,७१,०२४ मते घेऊन विजयी झाले आहेत. त्यांनी यास्मिन रशीद यांचा ५५ हजार मतांनी पराभव केला आहे. (Pakistan election results 2024) यास्मिन रशीद यांना इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचा (PTI) पाठिंबा होता.

पंतप्रधान बनण्याच्या तयारीत असलेले नवाज शरीफ, त्यांचे भाऊ शहबाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम शरीफ यांनी निवडणुकीत विजय मिळवला आहे. नवाज शरीफ यांनी लाहोरमधील NA-130 येथून विजय मिळवला आहे. तर शहबाज शरीफ यांनी लाहोरमधील PP-158 जागेवर विजय नोंदवला आहे. तर मरियम यांनी लाहोरच्या PP-159 जागेवर विजय मिळवला आहे.

पाकिस्तान गुरुवारी सकाळी ८ वाजता मतदान सुरू झाले आणि संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ते सुरू राहिले. १२ कोटींहून अधिक मतदारांना मतदान करता यावे यासाठी देशभरात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मतदान संपल्यानंतर मतमोजणी सुरू झाली आणि अनिवार्य एक तासाचा निर्बंध संपल्यानंतर वैयक्तिक मतदान केंद्रांचे निकाल लागले. इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयचा पाठिंबा असलेल्या काही उमेदवारांनी विजयाचा दावा केला आहे. त्यांनी मतदान केंद्रांमध्ये छेडछाड आणि मतमोजणी जाणूनबुजून थांबविल्याचा आरोपही केला आहे.

पाकिस्तानात गुरुवारी नॅशनल असेंब्लीसाठी मतदान सुरू असताना दहशतवाद्यांनी लज्जा येथे मतदान केंद्राजवळ बॉम्बस्फोट घडवून आणला होता. त्यात सात पोलिसांचा मृत्यू झाला. याखेरीज अन्यत्र विविध ठिकाणी झालेल्या हिंसाचारात दोन बालकांसह ९ जण ठार झाले आहेत.

हे ही वाचा :

 

Back to top button