चंद्रपूर : वन्यप्राण्यांना वाचविण्यासाठी वनविभागाचे रेल्वेला साकडे

चंद्रपूर : वन्यप्राण्यांना वाचविण्यासाठी वनविभागाचे रेल्वेला साकडे
Published on
Updated on

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चांदा फोर्ट ते गोंदिया रेल्वे मार्ग हा वन्यजीवांसाठी धोकादायक ठरत आहे. २ दिवसांपूर्वी रेल्वेच्या धडकेत एका तीन महिन्यांच्या वाघाच्या बछड्याचा मृत्यू झाल्याने हा मुद्दा पून्हा एकदा चर्चेला आला आहे. २००८ ते २०२३ पर्यंत एकूण ६ वाघांचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाला. त्यामुळे याबाबत उपाययोजना करण्यासाठी वनविभागाने आज (दि.२९) रेल्वे विभागाकडे वन्यप्राण्यांच्या मृत्यूचा अहवाल पाठविला असून वन्यजीव रक्षणासाठी उपाययोजना सुचविल्या आहेत. याबाबत रेल्वे प्रशासनाने अनुकूलता दाखविल्याने येत्या काळात रेल्वेच्या धडकेने होणारे वन्यजीव मृत्यू थांबण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

चंद्रपूर जिल्हा हा घनदाट जंगलाने वेढलेला आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक जंगल असलेला हा जिल्हा आहे. चंद्रपूरच्या बाबपेठला चांदा फोर्ट रेल्वे स्टेशन आहे. येथून नागभीड ते गोंदिया रेल्वे मार्ग आहे. हा मार्ग चंद्रपूर, मूल, सिंदेवाही, नागभीड तालुक्याला जोडतो. या रेल्वे मार्गाच्या दुतर्फा घनदाट जंगल आहे. येथून वन्यजीवांचा मुक्तसंचार आहे. वाघ, बिबटे, हरण, रानगवा, रानडुक्कर आदी वन्यजीवांचा यात समावेश आहे. रेल्वे मार्ग ओलांडत असताना अनेकदा रेल्वेच्या धडकेत वन्यजीवांचा मृत्यू होतो, हा एक गंभीर विषय आहे.

पाच वर्षांत ६ वाघ २ बिबट्यांचा मृत्यू

२०१८ पासून २०२३ पर्यंत चंद्रपूर येथील रेल्वे मार्गावरील अपघातात तब्बल ६ वाघ आणि २ बिबट्यांचा मृत्यू झाला. यात चंद्रपूर वन क्षेत्रातील ३ तर वन विकास महामंडळाच्या क्षेत्रातील ३ वाघांचा समावेश आहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये लोहाराच्या जंगलात रस्ता ओलांडत असताना तब्बल तीन वाघांच्या बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर वाघीण देखील जखमी झाली. यानंतर १० ऑगस्ट २०२२ ला राजुरा तालुक्यातील चनाखा येथे रेल्वेच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू झाला, २१ ऑक्टोबर २०२२ ला राजुरा तालुक्यातील चूनाळा मार्गावर अपघातात वाघाचा मृत्यू झाला, २७ नोव्हेंबर २०२३ ला नागभीड बाळापूर रेल्वे मार्गावर एक तीन महिन्याच्या वाघाचा मृत्यू झाला. तर ८ ऑक्टोबर २०१९ मध्ये सावली चिखली मार्गावर एका बिबट्याचा मृत्यू झाला तर ७ मार्च २०२३ ला जीवंत विद्युत तारांच्या संपर्कात आल्याने बिबट्याचा मृत्यू झाला होता.

वनविभागाने सुचविल्या उपाययोजना

वन्यजीवांच्या सुरक्षित संचारासाठी वनविभागाने काही पर्यायी सूचना दिल्या आहेत. ज्या ठिकाणी खुरटे जंगल आहे. त्या रेल्वे रुळाच्या बाजूने सुरक्षा जाळी लावण्यात यावे, प्राण्यांना येण्या – जाण्यासाठी भूमिगत मार्ग काढण्यात यावे, रेल्वे रुळाच्या बाजूला निर्माण झालेले खड्डे बुजविण्यात यावे, जेणेकरून तिथे पाणी पिण्यासाठी वन्यजीव फिरकणार नाही, वळणरस्त्यावर रेल्वेची गती कमी करणे आदी उपाय योजना सुचविल्या आहेत.

रेल्वे विभागाने केले दुर्लक्ष

२०१८ मध्ये वनविकास महामंडळाच्या क्षेत्रातील वाघाच्या तीन बछड्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर वनविभाग आणि रेल्वे विभागाची संयुक्त बैठक झाली. यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या सर्व उपाययोजना सांगितल्या मात्र तेव्हा रेल्वे विभागाने याकडे दुर्लक्ष केले.

आता रेल्वे विभाग सकारात्मक

मंगळवारी (दि.२८) सकाळी एका वाघाच्या बछड्याचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याचे समोर आले. यानंतर चंद्रपूर वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क केला असून रेल्वे मार्गावर झालेल्या अपघातात किती वाघ आणि बिबट्यांचा मृत्यू झाला याचा अहवाल देण्यात आला. याबाबत आता रेल्वे विभाग सकारात्मक असून वरीष्ठ पातळीवर लवकरच याबाबत तोडगा निघण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news