चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : मालमत्ता कर आणि पाणीपट्टीत वाढ करण्यात आल्याने संतापलेल्या नागरिकांनी सरपंच, सचिवासह ग्रामपंचायत सदस्यांना साडेतीन तास ग्रामपंचायत कार्यालयात डांबून ठेवल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील देवपायली येथे आज (दि.२९) घडली.
देवपायली ग्रामपंचायतीत आज (बुधवारी) ग्रामसभा आयोजित केली होती. ग्रामसभेत विविध विषयावर चर्चा झाली. त्यापैकी मालमत्ता व पाणीपट्टी कर वाढविण्याबाबत चर्चा करून त्यामध्ये वाढ करण्याच्या निर्णय घेण्यात आला. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप उफाळून आला. करवाढ होत असल्याचे लक्षात येताच संतप्त नागरिकांनी सरपंच, ग्रामसेवकासह ग्रामपंचायतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यालयात डांबले. तब्बल साडेतीन तास ही मंडळी कुलूपबंद होती. घटनेची माहिती मिळताच पोलिस देवपायली येथे पोहचले. पोलिसांनी नागरिकांना समजावले. त्यानंतरच नागरिकांनी कुलूप उघडले व सरपंच, सचिव, सदस्यांची सुटका केली.
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या देवपायली ग्रामपंचायतमध्ये यापूर्वी ७ नोव्हेंबरला ग्रामसभा बोलाविण्यात आली होती, परंतु सभा तहकूब करण्यात आली. तहकूब झालेली ही ग्रामसभा बुधवारी (दि.२९) घेण्यात आली. सभेला सरपंच अरविंद कोहपरे, ग्रामसेवक प्रशांत दोडके, सदस्य अर्चना ठाकरे, इंदिरा नवघडे, मोरेश्वर नवघडे, वैशाली भोयर यांची उपस्थिती होती. सरपंचांनी सभेला सुरुवात केली. काही वेळातच ग्रामसभा संपली. ग्रामसभेत मालमत्ता कर व पाणीपट्टीवाढीचा ठराव मंजूर करण्यात आला. ही माहिती गावात पसरताच नागरिक चांगलेच संतापले. त्यामुळे नागरिकांनी सरपंच सचिवासह ग्राम पंचायत सदस्यांना कार्यालयात कुलूप लावून डांबून ठेवले. पोलिसांच्या मध्यस्थीनं सर्वांची सुटका करण्यात आली.
सरपंचांच्या परवानगीने पाणीपट्टी व मालमत्ता करवाढीचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय नियमानुसार आहे, अशी माहिती ग्रामसेवक प्रशांत दोडके यांनी दिली. नागरिकांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने करवाढ करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पोलिसांनी नागरिकांची समजूत काढली. त्यामुळे त्यांनी सर्वांची सुटका केली. या प्रकरणात कुणीच तक्रार न केल्याने पोलीसांनी कारवाई केली नाही. सध्या गावात शांतता आहे. देवपायलीत पुढील ग्रामसभा ४ डिसेंबरला होणार आहे. ग्रामपंचायतीने मागणी केल्यास ग्रामसभेला पोलिस बंदोबस्त पुरविण्याची तयारी पोलिसांनी दर्शविली आहे.
हेही वाचा :