चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील 11 युवकांनी बनविली हायड्रोजन कार | पुढारी

चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील 11 युवकांनी बनविली हायड्रोजन कार

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्हातील 11 युवकांनी मिळून हायड्रोजनवर चालणारी कार तयार केली आहे. ही कार नुकत्याचा पार पडलेल्या श्री माता महाकाली महोत्सवात ठेवण्यात आली होती. ज्या युवकांनी कार तयार केली त्यांची आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घडवून आणली. उप मुख्यमंत्री फडणवीस यांनीही युवकांचे कौतुक करीत सरकार मदत करेल असा विश्वास दिला आहे. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्या सोबत कारची निर्मिती करणारे हर्षन नक्षीने, साईल काकडे, प्रज्वल जमदाडे, जय विधाते, दिपक मालेकर, वैभव मांडवकर उपस्थित होती.

चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील 11 युवकांनी मिळून हायड्रोजनवर चालणारी अत्याधुनिक कार तयार केली आहे. कारमध्ये सुरक्षा संसाधनापासून सर्व लक्झरी सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. ही कार तयार करण्याकरीता दोन वर्षाचा कालावधी लागला असून युवकांनी स्व:खर्चातून कार तयार केली. टायर आणि काच वगळता कारसाठी वापरण्यात आलेले सर्व उपकरणे त्यांनीच तयार केले आहेत. एक किलो हायड्रोजनवर 250 किमी कार चालत असल्याचा दावा युवकांनी यावेळी केला आहे. कार अद्यावत एआय तंत्रज्ञानावर आधारित चालक विरहीत असल्याची माहिती यावेळी तरूणांनी दिली.

ही कार रस्त्यावर उतरविण्यासाठी मदतीची अपेक्षा युवकांनी व्यक्त केली आहे. याकरिता आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. चंद्रपूरात आयोजित श्री माता महाकाली महोत्सवातही सदर कार ठेवण्याची संधी आमदार किशोर जोरगेवार यांनी उपलब्ध करुन दिली होती. यावेळी त्यांनी युवकांचे कौतुक करीत शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले होते. आता आमदार जोरगेवार यांनी युवकांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घालून दिली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारची पाहणी करत संपूर्ण माहिती जाणून घेतली. या कारमुळे प्रदुषण कमी होणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. या कारला रस्त्यावर आणण्यासाठी सरकारच्या वतीने सहाकार्य केले जाईल, असा विश्वास त्यांनी युवकांना दिला आहे.

हेही वाचा :

Back to top button