चंद्रपूर : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबिसींचे अनोखे आंदोलन | पुढारी

चंद्रपूर : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबिसींचे अनोखे आंदोलन

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला सरसकट ओबीसींमध्ये समाविष्ट करु नये यासह विविध मागण्यांकरीता चंद्रपुरात ओबिसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष रवींद्र टोंगे उपोषणाला बसले आहेत. दरम्यान, सरकारने त्यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष केल्याने ओबिसींकडून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. आंदोलकांनी गुरुवारी (दि.२१) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे मुखवटे लावून सामुहिक मुंडन केले.
राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र टोंगे यांनी ११ सप्टेंबर पासून चंद्रपुरात जिल्हाधिकारी कार्यालयासोर अन्नत्याग आंदोलन  सुरू केले आहे. ओबीसी मधून सरसकट मराठ्यांना आरक्षण देऊ नये, बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात जातनिहाय सर्वे व्हावा व ओबीसी मुलामुलींचे वसतीगृह सुरू करून स्वाधार योजना लागू करावी आदी मागण्यांकरीता त्यांचे आंदोलन सुरू आहे. काल दहाव्या दिवशी रविंद्र टोंगे यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांचेवर रूग्णालयात उपचार व्हावे, अशी अपेक्षा वैद्यकीय विभागाने वर्तविली होती. परंतु  टोंगे यांनी नकार देत उपोषण मंडपात जरांगे पाटलांवर उपचार होवू शकते तर माझ्यावर का नाही?  असा संतप्त सवाल उपस्थित केल्यानंतर उपोषण मंडपातच त्यांचेवर उपचार सुरू करण्यात आले आहे.
 ओबिसी बांधवांनी १७ सप्टेंबरला चंद्रपूरात महामोर्चा काढून सरकारच्या विरोधात प्रचंड संताप व्यक्त केला. त्यानंतरही टोंगे यांची प्रकृती बिघडत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या दिवसापासून चंद्रपूरातील ओबीसी बांधवाच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात ओबीसी समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. उपोषणकर्ते रवींद्र टोंगे यांची ११ व्या दिवशी प्रकृती खालावली आहे. टोंगेंच्या जीवाचे बरेवाईट झाल्यास संपूर्ण राज्यात उद्रेक होईल, असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाने दिला आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button