चंद्रपूर: म्हैशीचे रौद्र रूप पाहून वाघाने ठोकली जंगलात धूम (Video)
चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा: वाघ आणि मानव यांच्यातील संघर्ष चंद्रपूर जिल्ह्यात नवा नाही. मानव व वन्यप्राण्यातील संघर्षात अनेक शेतकरी, शेतमजुरांचे बळी गेलेले आहेत. या संघर्षाप्रमाणेच आता वन्य व पाळीव प्राणी यांचा संघर्ष समोर आला आहे. वाघांच्या हल्यात अनेक पाळीव जनावरांचे जीव गेलेले आहेत. परंतु आता वन्य व पाळीव जनावरांमधील संघर्ष टोकाला जात असल्याचे दिसून येत आहे.
या संघर्षातूनच आता पाळीव जनावरेही वन्यप्राण्यांवर चालून जाऊ लागले आहेत. अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका कालवडावर वाघाने हल्ला करून जीव घेण्याचा प्रयत्न करताच म्हैशीने त्याला वाचविण्याकरीता वाघावरच धावा बोलला. म्हैशीचा आक्राळविक्राळ रूप पाहताच वाघाला धूम ठोकावी लागली. हा व्हिडिओ चंद्रपूर शहरालगत असलेल्या ऊर्जानगर परिसरातील असल्याची माहिती समोर आली आहे.
ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पालगत अनेक गावे आहेत. घनदाट जंगल असल्याने गावालगत वन्यप्राण्यांचे दर्शन नवे राहिलेले नाही. खास करून वाघांचे दर्शननित्याची बाब झाली आहे. गावाशेजारी, गावात येऊन अनेक नागरिकांचे बळी गेल्याच्या घटना ताज्या आहेत. त्याप्रमाणे वन्यप्राण्यांकडून पाळीव जनावरांची होणारी शिकार नित्यचीच बाब झाली आहे. मानवासोबत पाळीव जनावरे मृत्यमुखी पडत असल्याचे जिल्ह्यात पाहायला मिळत आहेत. मानव व वन्यप्राणी तसेच आता वन्यप्राणी व पाळीव प्राणी यांच्यातील संघर्ष टोकाला जात असल्याचे दिसून येत आहे.
चंद्रपूर शहरापासून जवळच असलेल्या महाऔष्णिक विद्युत केंद्र व लगतच्या ऊर्जानगर परिसरात वन्य प्राण्यांचा वावर नेहमीच आढळून येतो. ताडोबा अभयारण्याला हा परिसर लागून असल्याने वाघ, बिबट्यांचे वास्तव येथे आहे. नेहमी प्रमाणे वाघाने म्हैशीच्या कालवडावर हल्ला करीत शिकार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली. ही घटना ऊर्जानगर परिसरातील पाईपलाईन जवळ घडली. ही घटना एका व्यक्तीने मोबाईलच्या कॅमेरात कैद केली. एका गुराख्याने काही म्हैशी जंगलालगत चारावयाकरीता नेल्या होत्या. म्हैशी चरत असताना एका पट्टेदार वाघाने शिकार करण्याचा प्रयत्न केला. दबा धरून बसलेल्या वाघाने म्हैशीच्या कालवडावर अचानक हल्ला केला.
त्या हल्यापासून स्वत:चा बचाव करण्याकरीता कालवड पळू लागले. लगतच असलेल्या एका म्हैशीने कालवडावर वाघाचा हल्ला झाल्याचे आढळून येताच, त्या म्हैशीने वाघाच्या दिशेने हल्लाबोल केला. वाघ आपले भक्ष्य टिपणार तेवढ्यातच म्हैशीचा हल्ला वाघाच्या लक्षात आला. म्हैशीच्या हल्याच्या भितीने वाघाने आपल्या तावडीतील कालवडाला सोडून पळ काढला. बराच अंतरावर म्हैशीने त्या वाघाचा पाठलाग केला. त्या वाघाला लांबदूर धूम ठोकावी लागली. त्या म्हैशीच्या मागे अन्य म्हैशींनीही त्या वाघाचा पाठलाग केल्याचे त्या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.
हेही वाचा

