

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव-जलंब रेल्वे मार्गावर सोमवारी (दि.२४) पाण्याची टाकी कोसळली. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली असून, दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर सेवा पूर्ववत होईल, असे सांगण्यात आले.
रेल्वे मार्गावर असलेली ही पाण्याची टाकी जीर्ण झालेली होती. पाण्याची टाकी पडल्यामुळे रेल्वे मार्गावरील विद्युत तारांसह ट्रॅकचे नुकसान झाले आहे. रेल्वे मार्ग जेसीबीच्या मदतीने पूर्ववत सुरू करण्यात येत आहे. रस्त्याच्या खोदकामादरम्यान टाकीचा खालील भाग खचल्याने टाकी रेल्वे मार्गावर कोसळली आहे. सुदैवाने या घटनेत जीवित हानी झालेली नाही.
घटनास्थळी पडलेल्या लोखंडी बीम आणि तुटलेल्या सिमेंटच्या ढिगाऱ्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने टाकी कोसळण्याच्या वेळी आसपास कोणीही नव्हते. रेल्वे अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सुरक्षा पथक तैनात केले आहे. या टाकीतून पूर्वी इंजिनासाठी पाण्याचा पुरवठा केला जात होता.
आता ती वापरात नसल्याने दीर्घकाळापासून दुर्लक्षित अवस्थेत पडून होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. रस्त्याच्या खोदकामादरम्यान टाकीचा खालील भाग खचल्याने टाकी रेल्वे मार्गावर कोसळली, असे कळते. जलंब खामगाव हा 16 कि.मी.चा मार्ग असून, एकच लोको पायलट धावते.