

देऊळगाव राजा ः देऊळगाव राजा व सिंदखेडराजा तालुक्यातील जऊळका, ताडसिवणी, दुसरबीड व देवखेड परिसरातील खडकपूर्णा नदीपात्रात वाळू घाटांच्या लिलावाच्या नावाखाली जेसीबी व बोटींच्या साहाय्याने अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी दोषी अधिकारी व ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख अनिल चित्ते यांनी केली आहे.
याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच महसूल विभागाचे अप्पर सचिव यांना लेखी तक्रार देण्यात आली आहे. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, संबंधित गावांमधील नदीपात्रात पोकलँड (जेसीबी) व बोटींच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन सुरू आहे.
या अवैध उत्खननामुळे खडकपूर्णा नदीकाठावरील शेतकऱ्यांच्या विहिरी धोक्यात आल्या असून नदीपात्राचेही मोठे नुकसान होत असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या संदर्भात स्थानिक ग्रामस्थांनी अनेकदा आंदोलन व उपोषण करूनही संबंधित तहसीलदार व वरिष्ठ प्रशासनाने या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, अवैध वाळू उत्खननाच्या विरोधात स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा आज 20 वा दिवस पूर्ण झाला असून अद्यापही प्रशासनाकडून ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे आता प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे संपूर्ण परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
चौकशी करून दोषींवर कारवाई करावी
तक्रारीसोबत अवैध उत्खननाचे पुरावे जोडले आहे.संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख अनिल चित्ते यांनी केली आहे.