

देऊळगाव राजा : देऊळगाव राजा शहरातील शिवाजी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ अल्पवयीन विद्यार्थ्यावर शाळा सुटण्याच्या वेळेस चाकूहल्ला झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे पालकांसह विद्यार्थ्यांत भीतीचे वातावरण पसरले असून, पुन्हा एकना शाळा सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, मंगळवार दि.6 रोजी देऊळगाव राजा शहरात शिवाजी हायस्कूल आहे. नेहमीप्रमाणे शाळा भरली. विद्यार्थ्यांची रेलचेल सुरू होती. अल्पवयीन विद्यार्थी देखील शाळेत आला होता. शाळा सुटल्यानंतर सर्वजन घरी जाण्याच्या तयारीत होते. तो अल्पवयीन शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ येताच त्याच्यावर अज्ञात तरुणाने चाकूने हल्ला चढवला. काही कळायच्या आत विद्यार्थी भितीने गांगरुन गेला. या हल्यात तो जखमी झाला. गंभीर अवस्थेत त्याला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हा चाकु हल्ला का झाला? कोणी केला? याचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक ब्रह्मगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.
कायद्याची भीती उरली नाही
भर दिवसा शाळेच्या आवारात झालेल्या चाकू हल्ल्याने शाळेय परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पालकांत देखील धाकधुक वाढली आहे. मुलींच्या छेडछाडीच्या घटनात वाढ होत आहे. कायद्याची भीती नसल्यामुळे या प्रकारात वाढ होत अहे.