

जालना : कृषि उत्पन्न बाजार समिती, जालना येथे शुक्रवार (दि. 9) रोजी शेतमालाची मोठ्या प्रमाणावर आवक झाली. एकूण 13,175 क्विंटल शेतमालाची आवक नोंदविण्यात आली असून यामधून सुमारे 7 कोटी 33 लाख 49 हजार 480 रुपयांची उलाढाल झाली. तुरीसह कापूस व सोयाबीनला समाधानकारक भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
कापसाच्या (सी.सी.आय.) 1,549 क्विंटल आवकीला कमाल 8,010 रुपये, तर सरासरी 7,850 रुपये भाव मिळाला. तुरीच्या पांढऱ्या जातीसाठी 4,559 क्विंटल आवक झाली असून कमाल 7,426 रुपये, तर सरासरी 7,000 रुपये दर नोंदविण्यात आला. लाल तुरीला देखील चांगला प्रतिसाद मिळाला.
सोयाबीन (पिवळा) 3,483 क्विंटल आवकीला सरासरी 4,950 रुपये भाव मिळाला. ज्वारी, बाजरी, मका आणि हरभरा या पिकांच्या दरातही स्थिरता दिसून आली. ही माहिती प्रशासक परमेश्वर वरखडे व सचिव भरत तनपुरे यांनी दिली.
गव्हाला 2600 भाव
गव्हाला सरासरी 2,600 रुपये, तर मक्याला 1,650 रुपये दर मिळाला. एकूणच बाजार समितीत आवक वाढल्याने व्यवहार उत्साही झाले असून आगामी काळात दर टिकून राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.