

संघपाल वाहूळकर
जालना : महापालिकेची निवडणूक रंगतदार वळणार आली. महाविकास आघाडीतील भाजपा, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) आदी मित्र पक्ष आणि महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना (उध्दव सेना) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्यात चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. पहिल्या वहिल्या महापालिकेचा महापौर आपलाच व्हावा, यासाठी सर्वच पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
दरम्यान, महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपाने आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेने कार्यकर्त्यांत बळ निर्माण केले. तर महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उमेदवारांना मार्गदर्शन करून महापालिकेवर आपलाच झेंडा रोवावा, असे सांगितले. तर राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची सभा पार पडली.
या सभेमुळे राष्ट्रवादी देखील मैदानात कंबर कसून उतरली असल्याचे दिसून येते. तर येत्या 11 तारखेला शिवसेना (शिंदे गट) नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो असल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडी देखील उमेदवार निवडूण आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
अपक्षाची भूमिका निर्णायक
प्रत्येक प्रभागात कमी अधिक प्रमाणात अपक्ष आपली ताकद आजमावत आहे. यात देखील वेगवेगळ पक्षाकडून तिकीट न मिळणाऱ्यांचा भरणा अधिक आहे.
वंचित, एमआयएमचे आव्हान
महानगरपालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सर्वच पक्षाच्यावतीने प्रचारावर जोर देण्यात येत आहे. गल्लोगल्ली जाऊन भोंग्यांच्या माध्यमातून उमेदवारावा प्रचार केल्या जात आहे. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमने स्वबळाचा नारा दिला आहे. यामुळे प्रस्थापित उमेदवारांना या पक्षाचे तगडे आव्हान असणार आहे. दोन्ही पक्षांनी 17 जागेवर आपले उमेदवार दिले आहेत. जालना शहरातील 16 प्रभागांसाठी निवडणूक होत आहे. सुमारे 453 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. उमेदवारांकडून सामाजिक प्रश्न, स्थानिक समस्या, विकासाचा संदेश पोहचविण्याचा आटोकाट प्रयत्न केल्या जात आहे. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातही पथनाट्यांच्या माध्यमातूनही विकासाचा मुद्दा मतदारापर्यंत पोहचविण्यात येत आहे.
प्रचाराची रंगत, कॉर्नर बैठकावर जोर
आता हातात केवळ पाचच दिवस उरले आहे. त्यामुळे जालना शहरात प्रचाराचा धुरळा पाहायला मिळत आहे. प्रत्येक प्रभागात पॅनलप्रमुख, पक्षाच्यावतीने कॉर्नर बैठका घेण्यात येत आहे. बड्या नेत्यांच्याही सभा आता झाल्या आहेत. एकंदरीतच प्रचाराची रंगत वाढत आहे. शहराचे वातावरण प्रचारमय झाले असल्याचे दिसून येत आहे. सकाळपासूनच दारोदारी फिरून मतदारांना गळ घालण्यात येत आहे.