

Penalty for Nylon Manja
बुलढाणा : पतंग उडविण्याच्या छंदात नायलॉन मांजाचा वापर वाढल्याने होत असलेल्या अपघातांना आळा घालण्यासाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कडक पवित्रा घेतला आहे.त्यानुसार,नायलॉन मांजाच्या वापरावर अंकुश ठेवण्यासाठी कठोर निर्देश दिले असून, त्यानुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून सर्वसामान्य जनतेसाठी सार्वजनिक सूचना जारी करण्यात आली आहे.
सन २०२१ पासून नायलॉन मांजावर बंदी असूनही आजमितीस सर्रासपणे नायलॉन मांजाचा वापर सुरू असल्याने दरवर्षी अनेक नागरिक व पक्षीही जखमी होत आहेत, तर गळा कापला गेल्याने काहींना जीवही गमवावा लागला आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे.
या पार्श्वभूमीवर,उच्च न्यायालयाने कठोर कारवाईपूर्वी संबंधितांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्याचे निर्देश दिले आहेत. एखादा अल्पवयीन मुलगा नायलॉन मांजाने पतंग उडवताना आढळल्यास, त्याच्या पालकांना ५० हजार रुपयांचा दंड न्यायालयात जमा करण्याचे निर्देश का देऊ नयेत? प्रौढ व्यक्ती नायलॉन मांजाने पतंग उडवताना आढळल्यास, त्या व्यक्तीला न्यायालयात ५० हजार रुपयांचा दंड जमा करण्याचे निर्देश का देऊ नयेत?
तसेच नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या विक्रेत्याकडून साठा जप्त झाल्यास, प्रत्येक उल्लंघनासाठी न्यायालयात २ लाख ५० हजार रुपयांचा दंड जमा करण्याचे निर्देश का देऊ नयेत? या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या वतीने सूचना जारी करण्यात आली आहे.
या प्रकरणाची सुनावणी ५ जानेवारी २०२६ रोजी उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर येथे होणार आहे. कुणाला प्रस्तावित कारवाईविरोधात निवेदन सादर करायचे असल्यास त्यांनी सुनावणीच्या दिवशी प्रत्यक्ष उपस्थित राहून आपले म्हणणे मांडावे. कोणीही हजर न राहिल्यास किंवा निवेदन सादर न केल्यास, नायलॉन मांजाच्या वापरकर्त्यांकडून व विक्रेत्यांकडून दंड वसूल करण्यास सर्वसामान्य जनतेचा कोणताही आक्षेप नाही, असे गृहीत धरले जाईल, असेही सूचनेत नमूद करण्यात आले आहे.