

बुलढाणा : जिल्ह्यातील अकरावी नगर परिषद निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये भाजपाने ४, कांग्रेसने ३, तर दोन्ही राष्ट्रवादी व दोन्ही शिवसेना या चार पक्षांनी प्रत्येकी एका नगर परिषदेवर नगराध्यक्ष पदाचा झेंडा रोवला आहे. सर्व ११ ठिकाणी चुरशीच्या लढती झाल्याने सर्व आमदारांनी राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली होती.
जिल्ह्यात भाजपाचे चार आमदार असून चिखली, खामगाव,नांदूरा व जळगांव जामोद या चार नगरपरिषदांवर भाजपाने गड राखला. पण काँग्रेस पक्षाचा एकही आमदार नसताना लोणार, शेगांव व मलकापूर या तीन नगर परिषदांवर कांग्रेसने ताबा मिळवला, ही बाब आजच्या निकालात अधोरेखित होत आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना त्यांच्या मेहकर व लोणार या दोन्ही होमपीचवर मोठा धक्का बसला आहे.
मेहकर नगराध्यक्षपदी शिवसेना उ.बा.ठा.चे किशोर गारोळे निवडून आले आहेत.त्यांच्या विजयासाठी मेहकरचे शिवसेना उ.बा.ठा.आमदार सिध्दार्थ खरात यांनी ताकद लावली. लोणार नगराध्यक्षपदी कांग्रेसच्या मिराताई मापारी निवडून आल्या. मलकापूर नगराध्यक्षपदी काँग्रेसचे आणिक जवारीवाले विजयी झाले. भाजपा आमदार चैनसुख संचेती यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.खामगांव नगराध्यक्ष पदी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या वहिनी अपर्णाताई फुंडकर विजयी झाल्या. जळगांव जामोद नगराध्यक्षपदी भाजपाचे गणेश दांडगे निवडून आले. दांडगे यांच्यासाठी भाजपा आमदार डॉ. संजय कुटे यांनी ताकद लावली.
शेगांव नगरपरिषदेत काँग्रेसचे प्रकाश शेगोकार विजयी झाले. बुलढाणा नगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी पुजाताई गायकवाड विजयी झाल्या. कांग्रेसच्या लक्ष्मी काकस यांचा ३८२० मतांनी पराभव झाला. भाजपाचे जिल्हा अध्यक्ष विजय शिंदे यांच्या पत्नी अर्पिता शिंदे यांना अत्यल्प मते पडल्याने तिस-या क्रमांकावर राहिल्या. भाजपा जिल्हाध्यक्ष शिंदे यांना मोठा धक्का देणारा हा निकाल आहे. चिखली नगराध्यक्षपदी भाजपा आमदार श्वेताताई महाले यांचे खंदे समर्थक पंडितराव देशमुख हे विजयी झाले. त्यांनी कांग्रेस उमेदवार काशिनाथआप्पा बोंद्रे यांचा पराभव केला.सिंदखेडराजा नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सौरभ तायडे विजयी झाले. देऊळगावराजा नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या माधुरी शिंपणे विजयी झाल्या.