

बुलढाणा: प्रबंधित गांजाची चोरटी विक्री करण्याच्या हेतूने मलकापूर पांग्रा (ता.सिंदखेडराजा) शिवारात एका शेतक-याने कपाशी व तुरीच्या उभ्या पिकात लावलेला ८१ किलो ५६६ ग्राम वजनाचा प्रतिबंधित ओला व सुका गांजा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला.
या गांजाचे बाजारमूल्य सुमारे १२ लाख ५२ हजार रुपये आहे. मलकापूर पांग्रा येथील सुधाकर संपत गायकवाड या शेतक-याने त्याच्या शेतामध्ये प्रतिबंधित गांजाची अवैध लागवड व संगोपन केले असल्याची गोपनीय माहिती मिळाली. गुन्हे शाखेच्या पथकाने १८ डिसेंबरला संबंधित शेतात पंचासमक्ष छापा टाकून ओलसर गांजाची झाडे वजन ७६ किलो ६ग्राम (किंमत ११लाख ४०हजार९०० रु.)व सुकलेली गांजाची झाडे वजन ५किलो ५६०ग्राम (किंमत १लाख ११हजार२००रु.)असा एकूण १२लाख ५२हजार१००रूपयांचा गांजा जप्त केला.
आरोपी सुधाकर गायकवाड याच्यावर साखरखेर्डा पो.स्टे.मध्ये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.एलसीबीचे पोलीस निरीक्षक सुनिल अंबूलकर यांच्या नेतृत्वाखाली एपीआय यशोदा कणसे,पोहेका दिगंबर कपाटे,गजानन दराडे,वनिता शिंगणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.