

Mehkar Depot Rajmata Jijau Buses
बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा : मेहकर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी मेहकर आगारासाठी नव्या एसटी बसेसची मागणी केल्यानंतर राज्याचे परिवहन मंत्री तथा शिवसेना (शिंदे गट) नेते प्रताप सरनाईक यांनी तत्काळ दखल घेत १० नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस मेहकर आगाराला उपलब्ध करून दिल्या आहेत. या बसेस १५ जून रोजी आगारात दाखल झाल्या.
नव्या बसेस आगारात आल्यानंतर आमदार खरात यांनी त्यांचे पूजन केले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार खरात यांनी कार्यकर्त्यांसह नव्या बसमधून प्रवास करत आनंद व्यक्त केला.
दरम्यान, ७ जून रोजी मेहकर येथील नव्या बसस्थानकाचे उद्घाटन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते झाले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यावेळी आमदार सिद्धार्थ खरात यांनी मेहकर आगारासाठी ४० नव्या एसटी बसेसची मागणी केली होती. त्यावर प्रतिसाद देताना मंत्री सरनाईक यांनी ‘४० नव्हे, ५० बसेस देऊ’ असे आश्वासन दिले होते.
या मागणीनंतर अल्पावधीतच १० आधुनिक, आरामदायी आणि सुविधायुक्त ‘राजमाता जिजाऊ’ बसेसचा पहिला टप्पा मेहकर आगारासाठी पाठविण्यात आला. त्यामुळे प्रवाशांना अधिक चांगली सेवा उपलब्ध होणार आहे.
विशेष म्हणजे, दोन वेगवेगळ्या शिवसेना गटांतील नेत्यांमध्ये या निमित्ताने दिसून आलेले सौहार्द राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. राज्याच्या राजकारणात विविध घडामोडी सुरू असताना मेहकर आगाराला बसेस उपलब्ध करून देण्याच्या निर्णयामुळे दोन्ही गटांमधील संवाद आणि समन्वयाची सकारात्मक झलक पाहायला मिळाल्याची चर्चा रंगू लागली आहे.