

बुलढाणा : देऊळगाव राजा तालुक्यातील पिंपळनेर येथील बीज प्रक्रिया केंद्रावरून चोरीला गेलेले १४पोते कांदा बियाणे (वजन ६क्विंटल ६५किलो किंमत ४लाख ६५हजार रू.)स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ तपास करून जालना व अहिल्यानगर जिल्ह्यातील तीन चोरट्यांना जेरबंद करून त्यांच्या ताब्यातून ५.२१लाखांचा मुद्देमाल हस्तगत गेला.
पिंपळनेर येथील मो.अझहर मो.कलंदर यांच्या जुब्बूजी बायोमास ब्रिकेट इंडस्ट्रीज येथे प्रक्रिया करण्यासाठी आणलेले अथर्व सीड्स कंपनीचे कांदा बियाणे २५मे रोजी चोरी गेले होते.याबाबत देऊळगाव राजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. जिल्हा पोलिस अधिक्षक निलेश तांबे यांनी एलसीबीचे पोलिस निरीक्षक आशिष रोही यांच्या पथकाकडे या कांदा बियाणे चोरीचा तपास सोपवला होता. प्राप्त गोपनीय माहितीनुसार,एलसीबीच्या पथकाने १३जून रोजी जालना व अहिल्यानगर जिल्ह्यात छापे टाकले.
आरोपी अंकुश तेजराव खंदारे (४०,रा.जालना), विनोद विठ्ठल काळे (२९,लोहगाव ता.भोकरदन जि.जालना), भानुदास उर्फ राहूल बाबूराव गायकवाड (३२,रा.शेवगाव जि.अहिल्यानगर) या तीन संशयितांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून ५क्विंटल३५किलो कांदा बियाणे,दोन दुचाकी, तीन मोबाईल असा एकूण ५ लाख २१ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस निरीक्षक आशिष रोही,उपनिरीक्षक प्रताप बाजड,पोहेका शरद गिरी,गजानन दराडे,जगदेव टेकाळे,युवराज राठोड,मनोज खरडे , यांच्या तपास पथकाने ही कारवाई केली.