Buldhana Crime | बुलढाण्यातील 'जळगाव जामोद' प्रकरणाचा अहवाल दोन दिवसांत सादर करा : पोलीस महासंचालक

पोलीस महासंचालक सदानंद दाते यांचे आदेश
DGP Order Jalgaon Jamod case
पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी अमरावती परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांची आढावा बैठक घेतलीPudhari
Published on
Updated on

DGP Order Jalgaon Jamod case

अमरावती : राज्याचे पोलीस महासंचालक (डीजीपी) सदानंद दाते सोमवारी (दि.८) अमरावती दौर्‍यावर आले होते. यावेळी त्यांनी अमरावती परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी बुलढाण्यातील बहुचर्चित 'जळगाव जामोद' प्रकरणाचा सविस्तर आढावा घेतला आणि अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक (आयजी) डॉ. महेश पाटील यांना पुढील दोन दिवसांत या प्रकरणाचा चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. या अहवालाच्या आधारेच पुढील कारवाईची दिशा निश्चित होणार आहे.

पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना डीजीपी दाते यांनी या प्रकरणातील तपासावर काही गंभीर निरीक्षणे नोंदवली. ते म्हणाले, 'तपासात काही गंभीर त्रुटी आढळून आल्या असून चुकीच्या (निर्दोष) व्यक्तींवर कारवाई करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. कोणत्याही निर्दोष व्यक्तीवर कारवाई होऊ नये यावर आमचा भर आहे, मात्र वास्तविक दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.' या प्रकरणातील मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, ती पटविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

DGP Order Jalgaon Jamod case
Buldhana News : 'त्या'कथित खुनाच्या तपासातील निष्काळजीपणा उघड, 'एलसीबी'तील चौघांची तडकाफडकी उचलबांगडी..

काय आहे प्रकरण:

जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी एक मृतदेह आढळला होता. पोलिसांनी कोणतीही योग्य तपासणी किंवा खात्री न करता, हा मृतदेह एका बेपत्ता तरुणीचा असल्याचा निष्कर्ष काढला. इतकेच नव्हे तर, स्थानिक गुन्हे शाखेने त्या तरुणीच्या वडील आणि भावाला खुनाच्या आरोपाखाली बेड्या ठोकल्या होत्या. मात्र कथित मृत तरुणी जिवंत परतल्याने या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले. ज्या तरुणीच्या खुनाच्या आरोपाखाली तिचे वडील आणि भाऊ कारागृहात होते, ती तरूणी चक्क जिवंतपणे पोलीस ठाण्यात हजर झाली. यामुळे पोलिसांची मोठी नाचक्की झाली होती.

पोलीस महासंचालक म्हणाले, अमरावती शहराच्या वाढत्या व्यापानुसार पोलीस व्यवस्था वाढवली जाणार आहे. नवीन पोलीस ठाण्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव तयार केला जात असून लवकरच नवीन ठाणी व नवीन भरती केली जाईल. युवा पिढीला नशेपासून दूर ठेवण्यासाठी शाळा-महाविद्यालयांच्या मदतीने विशेष मोहीम राबवली जाईल. ८ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना प्रामुख्याने यात जोडले जाईल. तसेच अंमली पदार्थांची तस्करी करणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल. राज्यातील १,२०० पोलीस ठाण्यांपैकी ३०० ठाण्यांना विशेष 'चेकलिस्ट' पाठवण्यात आली आहे. तेथील सेवा-सुविधा, कार्यप्रणाली सुधारणे आणि आवश्यक संसाधने उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. तसेच सायबर विभागाला अधिक सक्षम बनवण्यासाठी पोलीस कर्मचार्‍यांना आधुनिक डिजिटल तपास पद्धतीचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे,असे त्यांनी सांगितले.

DGP Order Jalgaon Jamod case
Buldhana News | जळगाव जामोद परिसरात वनविभागाची मोठी कारवाई; लाखो रुपयांचा अवैध लाकूड साठा जप्त

अमरावतीशी माझे भावनिक नाते...

आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना डीजीपी सदानंद दाते भावूक झाले. ते म्हणाले, माझ्या २५ वर्षांच्या सेवाकाळात अमरावतीत घालवलेला वेळ अविस्मरणीय आहे. माझा प्रोबेशन (परिविक्षाधीन) कालावधी वलगाव येथे पूर्ण झाला होता. त्यानंतर मी येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणूनही काम पाहिले. विशेष म्हणजे माझ्या मुलीचा जन्मही अमरावतीतच झाला आहे, त्यामुळे या शहराशी माझे भावनिक नाते आहे. पत्र परिषदेला विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. महेश पाटील आणि पोलीस आयुक्त राकेश ओला उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news