

बुलढाणा : जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून इंधन टंचाईबाबत अफवा पसरवल्या जात आहेत. त्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. इंधन टंचाईच्या अफवा पसरवणारांवर थेट फौजदारी कारवाई केली जाईल असा इशारा पालकमंत्री मकरंद पाटील यांनी दिली आहे. या अनुषंगाने, जिल्हाधिकाऱ्यांनी इंधनाचा कृत्रिम तुटवडा रोखण्यासाठी जिल्ह्यात २२मे पासून कडक आदेश जारी केले आहेत. शेतकऱ्यांना पेरणीपूर्व शेतीकामासाठी ट्रॅक्टर व पाण्याच्या पंपासाठी डिझेल अत्यावश्यक आहे. ते प्राधान्याने व सुलभतेने द्यावे.
सध्या सोशल मीडिया आणि विविध वृत्तवाहिन्यांवर इंधनाच्या तुटवड्याविषयी अफवा पसरल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण तयार होऊन पेट्रोल व डिझेल पंपांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन इंधनाचा कृत्रिम तुटवडा निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहितेअंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात कडक आदेश जारी केले आहेत.
पंपांवर 'संयुक्त नियंत्रण पथके'
प्रत्येक पेट्रोल पंपावर लक्ष ठेवण्यासाठी महसूल, ग्रामपंचायत व पोलीस विभागाच्या कर्मचा-यांची 'संयुक्त नियंत्रण पथके' नेमण्यात आली आहेत. कुणालाही काळाबाजार करण्याच्या उद्देशाने अतिरिक्त इंधन साठा करू दिला जाणार नाही. कोणत्याही पेट्रोल पंप चालकाने 'नो स्टॉक' चा खोटा फलक लावून इंधनाची साठेबाजी करू नये.अनियमितता करणाऱ्या पंपांचा परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई
सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांद्वारे इंधन टंचाईबाबत अफवा पसरवून नागरिकांमध्ये घबराट निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींचा शोध घेऊन माहिती तंत्रज्ञान कायदा व भारतीय न्याय संहितेनुसार फौजदारी गुन्हे दाखल केले जातील असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.