Wahim petrol diesel | अफवांवर विश्वास ठेवू नका; वाशिम जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कारवाईचा इशारा
Wahim petrol diesel
प्रातिनिधीक छायाचित्रPudhari
Published on
Updated on

वाशिम: जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही काही ठिकाणी नागरिकांकडून पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी केली जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गरजू व वास्तविक ग्राहकांना इंधन मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता सार्वजनिक हिताच्या दृष्टीने तसेच इंधनाचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून प्रशासनाने महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत.

जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालक व मालकांनी पेट्रोल व डिझेल विक्री करताना संबंधित ग्राहक हा वाहनधारक असल्याची मूळ कागदपत्रांच्या आधारे पडताळणी करूनच इंधन विक्री करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहनांना प्राधान्याने इंधन पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

प्रत्येक पेट्रोल पंपावर पेट्रोलियम पदार्थांची आवक, विक्री व शिल्लक साठ्याच्या नोंदी नियमितपणे अद्ययावत ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच उपलब्ध पेट्रोल-डिझेल शिल्लक साठा, त्या दिवशी प्राप्त झालेला तेल साठा आणि मागणी केलेल्या साठ्याची माहिती दर्शनी भागात फलकावर दररोज प्रदर्शित करावी लागणार आहे.

नागरिकांनी पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी करू नये, गरजेपेक्षा अधिक इंधन साठवून ठेवू नये तसेच पेट्रोल-डिझेल टंचाईबाबत कोणत्याही अफवा पसरवू नयेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. पेट्रोल पंप परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा व इतर आवश्यक सुविधा अद्ययावत ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

सदर आदेशाचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी संबंधित पेट्रोल पंप मालक, चालक व व्यवस्थापक यांच्यावर राहणार असून स्थानिक पोलीस प्रशासन, महसूल विभाग तसेच अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्या समन्वयातून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

हा आदेश तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला असून पुढील आदेश निर्गमित होईपर्यंत तो लागू राहणार आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांविरुद्ध पेट्रोलियम नियम २००२, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ तसेच जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ मधील तरतुदीनुसार दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news