Buldhana Crime | देऊळगाव राजात दोन गटांत सशस्त्र संघर्ष; शिवसेनेच्या नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा खून

राजकीय व व्यावसायिक वर्चस्वाच्या वादातून रक्तरंजित थरार; २० आरोपी गजाआड
Deulgaon Raja NCP Shiv Sena  Violent Clash
नगरसेवक अन्वर शेख, आरिफ पठाणPudhari
Published on: 
Updated on: 

Deulgaon Raja NCP Shiv Sena Violent Clash

बुलढाणा : राजकीय आणि व्यावसायिक वर्चस्वाच्या जुन्या वादातून देऊळगाव राजा शहरातील एकाच समुदायातील दोन गट सोमवारी रात्री सशस्त्र संघर्षात आमनेसामने आले. चाकू, कुऱ्हाड, लोखंडी रॉड आणि काठ्यांनी झालेल्या या हल्ल्यात दोन्ही गटांच्या प्रमुखांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक शेख अनवर ऊर्फ अनु शेख अली (वय ४२) तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा कार्यकर्ता आसिफ ऊर्फ आरिफ हारून पठाण (वय ३५) यांचा समावेश आहे. या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी तातडीने बंदोबस्त वाढवत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणात आतापर्यंत दोन्ही गटांतील २० संशयितांना अटक करण्यात आली आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतापनगर परिसरातील भोलेशाह दर्ग्याजवळ सोमवारी रात्री साडेसातच्या सुमारास शेख अकीब शेख पाशू आणि त्याच्या साथीदारांनी चाकू, कुऱ्हाडी व लाकडी दांड्यांसह आसिफ ऊर्फ आरिफ पठाण यांच्या घरावर आणि घराबाहेर हल्ला केला. या हल्ल्यात आसिफ पठाण यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्या काही नातेवाईकांना गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी मृताचे नातेवाईक शेख अतिक शेख उमर यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Deulgaon Raja NCP Shiv Sena  Violent Clash
Buldhana News | महसूलमंत्री बावनकुळे यांची अंधाऱ्या रात्री मोबाईलच्या प्रकाशात दुष्काळी शेतशिवाराची पाहणी!

दरम्यान, दुसऱ्या गटाकडून शेख मुजाहिद शेख अली यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शाहरूख खान अहमदखान आणि त्याच्या साथीदारांनी कट रचून चाकू, लोखंडी रॉड व काठ्यांनी शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक शेख अनवर ऊर्फ अनु शेख अली यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणातही पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक पोलिसांसह दंगल नियंत्रण पथक आणि क्यूआरटी पथक शहरात तैनात करण्यात आले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांनी आरोपींना तातडीने अटक करण्याचे निर्देश दिल्यानंतर पोलिसांनी कारवाईचा वेग वाढविला. आतापर्यंत २० आरोपींना अटक करण्यात आली असून, अन्य फरार आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखेकडून शोध सुरू आहे.

Deulgaon Raja NCP Shiv Sena  Violent Clash
Buldhana news: समृद्धी महामार्गावर चालकाला मारहाण करून ३० टन कांद्याचा ट्रक पळवला; चौघांना अटक

दोन्ही गटांतील प्रमुखांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून राजकीय आणि व्यावसायिक वर्चस्वावरून वाद सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. याच वादाचे पर्यवसान सोमवारी रात्री झालेल्या भीषण सशस्त्र हल्ल्यात झाले. या रक्तरंजित घटनेने देऊळगाव राजा शहर हादरले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास देऊळगाव राजा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ब्रह्मा गिरी आणि एपीआय सविता कुमरे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news