

बुलढाणा : राज्याचे महसूलमंत्री तथा दुष्काळ निवारण मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज शनिवार दि.३ला रणथम (ता.मलकापूर)येथील शेतशिवाराची भर अंधारात मोबाईलच्या प्रकाशात पाहणी केल्याने त्यांचा हा दौरा आता चांगलाच चर्चेत येऊ लागला आहे.
पावसाअभावी करपलेली सोयाबीन, कपाशी आदी खरिपाच्या पिकांच्या शेतशिवाराचा आढावा महसूलमंत्र्यांनी अंधारात घेतल्याचे पाहून शेतकरी वर्गात आश्चर्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. मोबाईलच्या टिमटिमत्या उजेडात भणंग शिवारातील दुष्काळाचे गांभीर्य मंत्र्यांच्या दृष्टीस पडणार तरी कसे? असा प्रश्नच यानिमित्ताने समोर आला आहे.
राज्यातील खरिपाच्या दुष्काळग्रस्त परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे दौरे करत आहेत. बुलढाणा जिल्ह्य़ात मलकापूर तालुक्यातील रणथम येथील शेतशिवारातील पीक परिस्थितीची पाहणी करण्यासाठी व शेतक-यांना दिलासा देण्यासाठी शनिवार दि.३सप्टेंबरच्या सायंकाळी ५.३०वाजताची महसूलमंत्र्यांची भेटीची नियोजित वेळ होती.
परंतू शेगांवला मंदिरात दर्शन घेऊन व खामगांव येथे विश्रामगृहावर शेतक-यांची निवेदने स्वीकारण्यात बराच वेळ गेल्याने मंत्री बावनकुळे हे नियोजित वेळेपेक्षा दीड तास विलंबाने रणथम शिवारात पोहचले.अंधारामुळे मोबाईलच्या प्रकाशात त्यांनी शेतातील पिकस्थिती पाहिली. पावसाअभावी करपलेली कपाशीची व सोयाबीनची रोपटी शेतक-यांनी प्रातिनिधिक स्वरूपात त्यांना दाखवली. पण अंधारामुळे शेतशिवाराचे स्पष्ट चित्र दिसणे अवघडच झाले होते. यावेळी मंत्री बावनकुळे यांच्यासमवेत बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय सावकारे, मलकापुरचे आमदार चैनसुख संचेती उपस्थित होते.