बुलढाणा: सिंदखेडराजा येथे जिजाऊ जन्मोत्सव; टपाल तिकीटाचे अनावरण | पुढारी

बुलढाणा: सिंदखेडराजा येथे जिजाऊ जन्मोत्सव; टपाल तिकीटाचे अनावरण

सिंदखेडराजा; पुढारी वृत्तसेवा : राजमाता जिजाऊ यांचा ४२६ वा जन्मोत्सव सोहळा सिंदखेडराजा येथे आज (दि.१२) परंपरेनुसार उत्साहात साजरा करण्यात आला. लखुजीराव जाधव यांच्या राजवाडास्थित जिजाऊ जन्मस्थळावर जाधवांच्या वंशजांनी पहाटे राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याचे विधीवत पूजन केल्यानंतर जन्मोत्सव सोहळ्याला सुरुवात झाली.

पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जिजाऊ जन्मस्थळाचे दर्शन घेतले. जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त राजवाडा परिसर फुलांच्या माळांनी तसेच विद्युत रोषणाईने सजवण्यात आला. भगवे फेटे परिधान करत स्त्रियांनी परिसरात गर्दी केली होती.फटाक्यांची आतिषबाजी करत मावळ्यांनी .’जय जिजाऊ जय शिवराय ‘ च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला . परिसरात दहाव्या ते तेराव्या शतकातील दगडी शिल्पांचे व ऐतिहासिक पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. तसेच शाहिरी पोवाडे व प्रबोधनपर कार्यक्रमांचेही जन्मस्थळी आयोजन करण्यात आले होते.

 राजमाता जिजाऊ यांच्या टपाल तिकीटाचे अनावरण

राजमाता जिजाऊंची जन्मभूमी सिंदखेडराजाच्या विकासासाठी शासनाने मंजूर केलेला २६० कोटींचा विकास आराखडा वेगाने पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही वन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊ यांच्या ४२६ व्या जन्मोत्सवानिमित्त टपाल तिकीटाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, डॉ. संजय कुटे, ॲड. आकाश फुंडकर, श्वेता महाले, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, पोस्ट मास्तर जनरल अदनान अहेमद आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button