
बुलढाणा,पुढारी वृत्तसेवा : सोनेतारण कर्ज व्यवसाय करणा-या बॅँका व पतसंस्थांनी यापुढे ताकही फुंकून पिण्याचा धडा घ्यावा, अशी कारवाई बुलढाणा पोलिसांनी एका प्रकरणात केली आहे. एका सहकारी पतसंस्थेत गहाण ठेवलेले सोने हे चोरीचे निघाले आहेत. कर्जाच्या वसुलीसाठी त्या सोन्याची सराफाकडे विल्हेवाट लावणे पतसंस्थेच्या व सराफाच्या अंगलट आले आहे. गहाण ठेवलेले ते सोने घरफोडींच्या गुन्ह्यातील चोरीचे होते, हे पोलीस तपासात समोर आले आहे.
संबंधिताने गहाण ठेवलेले ते सोने सोडवून न नेल्यामुळे थकित कर्जापोटी पतसंस्थेने त्या सोन्याची एका सराफाकडे विल्हेवाट लावली होती. दरम्यान, एक सराईत घरफोड्या शहर पोलिसांच्या हाती लागला. तो घरफोडीच्या गुन्ह्यातील चोरीचे सोने हे सराफा बाजारात न विकता शहरातील युनायटेड अर्बन सहकारी पतसंस्थेतून सोनेतारण कर्ज घेऊन ते थकित ठेवायचा. नंतर सराफाकडे सोने मोडून पतसंस्था त्या कर्जाची वसुली करून घ्यायची. हा प्रकार त्या भामट्याच्या अंगवळणी पडल्याने चार जणांची टोळी तयार करुन शहरात घरफोड्या करुन चोरीचे सोने पतसंस्थेत गहाण ठेवायचा, असा प्रकार सुरू राहिला. पण अखेर बिंग फुटलेच.
पोलिसांनी या कारवाईत १२३ ग्राम सोने व ११३ ग्राम चांदी असा ६ लाख ६७ हजार २६६ रूपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सोन्याच्या मालकी हक्काबाबतची कागदपत्रे न पाहता चोरीच्या सोन्यावर कर्ज दिल्याने व त्या सोन्याची विल्हेवाट लावल्याप्रकरणी पोलीसांनी पतसंस्थेचा अध्यक्ष अभय चोपडा, व्यवस्थापक गणेश सोनोने, सराफ व्यवसायिक परेश विसपुते व अट्टल घरफोड्या सैय्यद आदिल सैय्यद मुनाफ या चौघांना गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. तर घरफोडीच्या टोळीतील अन्य तीन आरोपी फरार झाले आहेत.