Morocco FIFA WC : पराभवानंतर मोरोक्को खेळाडुंच्या ‘त्या’ कृतीने सर्वच झाले भावूक! | पुढारी

Morocco FIFA WC : पराभवानंतर मोरोक्को खेळाडुंच्या ‘त्या’ कृतीने सर्वच झाले भावूक!

पुढारी ऑनलाईन डेस्क : कतार येथे सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत मोरोक्कन संघाचा फ्रान्सने पराभव केला. गतविजेत्या फ्रान्सने हा सामना २-०ने जिंकल्याने मोरोक्को (Morocco FIFA WC) संघाचे स्वप्न भंगले. उपांत्य फेरीत पोहोचणारा मोरोक्को हा पहिला आफ्रिकन संघ ठरला. उपांत्य फेरीचा सामना पाहण्यासाठी मोरोक्कोचे सुमारे ५० हजार समर्थक स्टेडियमवर पोहोचले होते. सामन्यातील पराभवानंतर मोरक्कोच्या  खेळाडूंनी केलेली कृती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

उद्या (दि. १७ डिसेंबर) तिसऱ्या स्थानासाठी मोरोक्कोचा सामना क्रोएशियाशी होणार आहे. त्याला विजयासह स्पर्धेचा शेवट गोड करण्याची  संधी असेल. यंदाचा फुटबॉल विश्वचषक मोरोक्कोसाठी खूप महत्वाचा ठरला. त्यांनी बेल्जियम, स्पेन आणि पोर्तुगालसारख्या बलाढ्य संघांना पराभूत करत त्यांना विश्वचषक स्पर्धेच्या शर्यतीतून बाहेर केले. (Morocco FIFA WC)

फ्रान्सविरूध्दच्या सामन्यात पराभव स्वीकरल्यानंतर मोरोक्कोच्या खेळाडूंनी मैदानावर प्रार्थना करत सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांचे आभार मानले. याबाबत ईएसपीएन एफसीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून या क्षणाचे फोटो प्रसिध्द केले आहेत. “फ्रान्सविरुद्धच्या सामन्यातील पराभवानंतर मोरक्कोच्या खेळाडूंनी प्रार्थना करत चाहत्यांचे आभार मानले. या मोरक्को संघाने विश्वचषक जिंकला नसला तरी त्यांनी आमची मनं जिंकली आहेत.” असे संघाच्या सर्मथकांनी यावेळी सांगितले.

फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील मोरोक्कोचा प्रवास

मोरोक्कोने या विश्वचषकाची सुरुवात दमदार पद्धतीने केली. त्यांनी स्पर्धेतील पहिल्या सामन्यात क्रोएशियाला बरोबरीत रोखले. त्यानंतर बलाढ्य बेल्जियम संघाचा २-० ने पराभव केला. तसेच त्यांनी कॅनडाचा २-१ ने पराभव करत राऊंड ऑफ १६ मध्ये आपले स्थान निश्चित केले. राऊंड ऑफ १६ फेरीत झालेल्या सामन्यात त्यांनी बलाढ्य स्पेनचा पेनल्टी शुटआऊटमध्ये ३-० ने पराभव केला. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत पोर्तुगालचा १-० ने पराभव केल्यामुळे ख्रिस्तियानो रोनाल्डोचे स्वप्न भंगले. उपांत्य फेरीत झालेल्या फ्रान्सविरुद्धच्या सामन्यात त्यांचा २-० ने पराभव झाला. या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील मोरोक्कोचा पहिला पराभव ठरला.

हेही वाचा;

Back to top button