

भंडारा : नागपूरहून रायपूरला दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना अज्ञात वाहनाने चिरडले. या भीषण अपघातात दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच मृत्यूमुखी पडले. ही घटना बुधवार, १७ सप्टेंबर रोजी दुपारी २:५५ वाजता भंडारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या नवीन भंडारा बायपास रस्त्यावर कोरंबी पुलाजवळ घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दोघांचे मृतदेह रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात आणले.
द्वारका साहू (५७) आणि देव दास (२४) अशी मृतांची नावे असून ते छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यातील डोंगरगड तालुक्यातील रहिवासी आहेत. द्वारका साहू आणि देव दास हे त्यांच्या दुचाकीने नागपूरहून रायपूरला भंडारा बायपासवरून जात होते. कोरंबी गावातील बायपास पुलावर एका अज्ञात वाहनाने दोघांनाही धडक दिली.
अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पळून गेला. द्वारका साहू यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. देव दास हेही गंभीर जखमी झाले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह आणि दुचाकी घटनास्थळी आढळून आल्याने रस्त्याने जाणाऱ्यांनी भंडारा पोलिसांना माहिती दिली. भंडारा पोलिस अज्ञात चालकाचा शोध घेत आहेत.
अपघातात मृत्यूमुखी पडलेले देव दास यांनी हेल्मेट घातले होते. मात्र, अपघात झाला तेव्हा त्यांचे हेल्मेट उडून रस्त्यावर पडले. देव दास यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, त्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.