

भंडारा: शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी कुणी काय करेल, याचा नेम नाही. वृद्धपकाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी एका महिला सरपंचांनी चक्क बनावट आधारकार्ड तयार करुन स्वत:चे वय वाढविले. त्यानंतर योजनेचा लाभही घेतला. या प्रकरणाचे बिं फुटल्याने अपर जिल्हाधिकाऱ्यांनी सदर महिला सरपंचाला पदावरुन अपात्र केले. मोहाडी तालुक्यातील पिंपळगाव/कान्ह. येथे हा प्रकार उघडकीस आला.
पिंपळगाव /कान्ह येथील सरपंच रेखा गभणे यांनी वृद्धापकाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी बनावट आधार कार्ड तयार करून वय वाढवले होते. सरपंच रेखा ज्ञानेश्वर गभणे यांनी सरपंच होण्यापूर्वी वृद्धापकाळ योजनेच्या लाभ घेण्यासाठी दुसरा बनावट आधार कार्ड तयार केले होता. त्या आधार कार्डवर वय ४९ वरून थेट ७१ केले होते. १ जानेवारी २०२१ पासून शासनाकडून अनुदानही घेतले. दरम्यान मोहाडीच्या तहसीलदारांनी, शासनाची फसवणूक करून शासकीय योजनेचा लाभ घेत असल्याचे मत व्यक्त केले होते. दरम्यान पिंपळगाव/ कान्ह येथील उपसरपंच उमेश उपरकर यांनी १२ डिसेंबर २०२४ ला सरपंच रेखा गभणे यांच्याविरुद्ध अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रकरण दाखल केले होते. सदर प्रकरणाचा निकाल देत अपर जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी आदेश पारित केला.
आदेशानुसार सरपंच रेखा गभणे, सरपंच व सदस्य मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ -१ (ज ) अंतर्गत दोषी आढळून आल्याने त्यांना पदावरून कमी करण्यात आले. तसेच पद रिक्त झाले, असे अपर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात नमूद केले आहे.
मोहाडीच्या तहसीलदारांमार्फत वृद्धापकाळ निर्वाह योजनेतील बोगस लाभार्थी शोधण्यासाठी मोहीम सुरू केली होती. लाभार्थ्यांकडून वयाचे पुरावे जमा करण्यात आले. त्यात रेखा गभणे यांनी ७१ वर्ष वय वाढवून दिलेले आधार कार्ड तलाठ्यांकडे जमा केले. परंतु, सरपंचपदाचे नामनिर्देशन दाखल करताना ४९ वयाचे आधारकार्ड जोडले होते. हा प्रकार तेथील उपसरपंच उमेश उपरकर यांनी जिल्हाधिकारी, मोहाडी तहसीलदारांकडे तक्रार केली होती. सरपंचपदावरून अपात्र करण्याची मागणी केली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता.