

भंडारा : धावत्या रेल्वेगाडीसमोर उडी घेवून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात ४५ वर्षीय व्यक्ती गंभीररित्या जखमी झाला. ही खळबळजनक घटना आज गुरुवारी (दि. ११) रोजी दुपारी १. ४५ वाजताच्या सुमारास तुमसर येथे घडली. दिनेश भोंडे (४५) शिवाजी नगर, तुमसर असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तुमसर रोडकडून बालाघाटकडे निघालेल्या रेल्वेगाडीसमोर जात त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु, रेल्वेचालकाच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसला आणि अपघातात दिनेश गंभीर जखमी झाला.
प्राप्त माहितीप्रमाणे दिनेश भोंडे हा गेल्या काही महिन्यांपासून अर्धांगवायूच्या आजाराने ग्रस्त आहे. याच नैराश्यातून आजाराला कंटाळून त्याने आज सकाळी ७ वाजतादेखील रेल्वे गाडीसमोर येऊन आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे समजते. मात्र, हा प्रयत्न फसल्यामुळे त्याने दुपारी जाणाऱ्या रेल्वेगाडी समोर येवून दुसऱ्यांदा स्वत:ला संपविण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर तातडीने स्थानिक पोलिस आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी ईसमाला तातडीने उपचारासाठी जवळच्या वैद्यकीय केंद्रात नेण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनलक असल्याचे समजते. दरम्यान या घटनेमुळे अर्धा तास रेल्वे वाहतूक खोळंबली होती. याप्रकरणी रेल्वेपोलिसांनी पंचनामा व घटनेची नोंद करून सदर प्रकरण तुमसर पोलिसांकडे सोपविले आहे.