

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : वाळूची वाहतूक करताना पकडलेला ट्रॅक्टर सोडण्यासाठी २५ हजार मागणाऱ्या रोहा येथील तलाठ्याला 'लाचलुचपत'ने बुधवारी (दि.८) अटक केली. वैभव जनार्दन जाधव असे या तलाठ्याचे नाव आहे. रोहा हे अवैध वाळू तस्करीचे मोठे केंद्र आहे. याठिकाणाहून दररोज लाखो रुपयांच्या वाळूची तस्करी केली जाते.
याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार हे ट्रॅक्टरने वाळू, गिट्टी, सिमेंटची वाहतूक करतात. त्यांच्या तक्रारीनुसार, ११ मार्च रोजी तक्रारदार यांचा ट्रॅक्टर वाळूची वाहतूक करत असताना रोहाचे तलाठी वैभव जाधव यांनी पकडला. ट्रॅक्टर सोडविण्यासाठी जाधव यांनी २५ हजाराच्या लाचेची मागणी केली. त्यावेळी तक्रारदार यांनी जाधव यांना सध्या त्यांच्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. त्यावर जाधव यांनी 'तुझ्यावर विश्वास ठेवून ट्रॅक्टर सोडतो, पण नंतर पैसे आणून दे.' असे तक्रारदार त्यांना सांगितले. दरम्यान, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार तडजोडीअंती बुधवारी (दि.८) २० हजार देण्याचे ठरले. त्यानुसार २० हजाराची लाच स्विकारताना 'लाचलुचपत'ने सापळा रचून आज (बुधवारी) जाधवला ताब्यात घेतले.
ही कारवाई भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक डॉ. अरुणकुमार लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कमलेश सोनटक्के, पोलिस निरीक्षक अमित डहारे, उपनिरीक्षक संजय कुंजरकर, मिथुन चांदेवार, अतुल मेश्राम, नरेंद्र लाखडे, विवेक रणदिवे, राहुल राऊत, शिलपेंद्र मेश्राम, चेतन पोटे, मयूर सिंगनजुडे, अभिलाषा गजभिये यांनी केली.
हेही वाचा :