

Shivbhojan Center Problems
भंडारा : गोरगरीब वंचित लोकांना एकवेळच्या जेवनाची सोय व्हावी म्हणून शासनाच्या वतीने शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले. मात्र मागील ५ महिन्यापासून शिवभोजन केंद्रचालक अनुदानापासून वंचित असल्याने भोजनाची व्यवस्था कशी करावी? असा प्रश्न शिवभोजन केंद्रचालकांना पडला आहे.
शिवभोजन थाळी संचालन करणाऱ्यांचे गेल्या पाच महिन्यापासून अनुदान अडकले आहेत. जिल्हयातील ६० शिवभोजन थाळींचे अनुदान अडकले. नियमित अनुदान येत नसल्याने आतापर्यंत सरकारच्या मदतीच्या अपेक्षेपोटी सुरू असलेली थाळी आता सुरू ठेवणे कठीण होत आहे.
जिल्ह्यात गोरगरीब वंचित लोकांसाठी शिवभोजन केंद्रातून एकवेळच्या जेवनाची सोय होत आहे. त्यामुळे कुठे शिवभोजन १०० थाळी तर कुठे ७५ थाळीची सोय करण्यात आली. परंतु मागील ५ महिन्यापासून शिवभोजन केंद्रचालकांचे अनुदान रखडल्याने अन्नधान्य, भाजीपाला व इतर साहित्य केंद्रचालकांना उधारीवर घेण्याची पाळी आली आहे. तर एकीकडे किराणा दुकानदार साहित्य उधारी द्यायला मागेपुढे पाहत आहेत. तर कुणी दुकानदार चक्क उधारी देत नाही, त्यामुळे अन्नधान्य साहित्य तेल, गॅस व भोजनासाठी लागणारे इतर साहित्य कुठून आणावे ? असा प्रश्न शिवभोजन केंद्रचालकांना पडला आहे.
गाव- खेड्यातील नागरिक शहरात विविध कामासाठी येत असतात व शिवभोजनातच जेवन घेत असतात. १० रुपयात त्यांना जेवण मिळत असल्याने शेकडो गोरगरीब नागरिक शिवभोजन थाळीचा आस्वाद घेत आहेत. परंतु आता मागील ५ महिन्यापासून शासनाकडून मिळणारे अनुदान रखडल्याने शिवभोजन केंद्र कसे चालवावे? असा यक्षप्रश्न शिवभोजन केंद्रचालकांपुढे उभा ठाकला आहे.