

भंडारा: जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत परस्परविरोधी उभे असलेल्या दोन्ही पॅनलचे समान संचालक निवडून आल्याने नवा पेच निर्माण झाला आहे. सत्ता स्थापनेसाठी एका संचालकाची गरज असल्याने दोन्ही पॅनलमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे.
राजकीय नेत्यांनी प्रतिष्ठेची केलेली जिल्हा दूध संघाची निवडणूक आज शनिवारी पार पडली. १२ संचालकपदासाठी २५ उमेदवार रिंगणात होते. सर्व १६९ मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. विशेष म्हणजे, कॉंग्रेसचे आ. नाना पटोले आणि शिवसेना शिंदे गटाचे आ. नरेंद्र भोंडेकर यांनी या निवडणुकीसाठी युती केल्याने या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष होते. विद्यमान अध्यक्ष रामलाल चौधरी यांच्या नेतृत्वातील काँग्रेसप्रणित शेतकरी विकास पॅनल आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित विलास काटेखाये यांच्या नेतृत्वातील सहकार विकास पॅनल यांच्यात लढत होती.
निकालाअंती विद्यमान अध्यक्ष रामलाल चौधरी यांचा पराभव झाला. तर माजी अध्यक्ष विलास काटेखाये विजयी झाले. दोन्ही पॅनलचे प्रत्येकी ६-६ संचालक विजयी झाले आहेत. आता सत्ता स्थापनेसाठी एका संचालकाची गरज असून दोन्ही पॅनलमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे.
विजयी झालेल्या संचालकांमध्ये लाखनी तालुक्यातून शरद कोरे, साकोली तालुक्यातून मनोहर लंजे, लाखांदूर तालुक्यातून विलास शेंडे, मोहाडी तालुक्यातून नरेश पोटफोडे, पवनी तालुक्यातून विलास काटेखाये, भंडारा तालुक्यातून हितेश सेलोकर, तुमसर तालुक्यातून मुकुंदा आगाशे, इतर मागासवर्ग प्रवर्गातून विवेक पडोळे, भटक्या विमुक्त जाती/जमाती, विशेष मागास प्रवर्गातून आशिष पातरे, अनु.जाती, जमाती राखीव प्रतिनिधी गटातून आशिष मेश्राम आणि महिला प्रतिनिधी गटातून अस्मिता शहारे आणि अनिता तितिरमारे यांचा समावेश आहे.