

Sakoli knife threat news
भंडारा : साकोली तालुक्यात सानगडी परिसरात मागील काही दिवसांपासून अज्ञातांकडून शालेय लहान मुलींना रस्त्यात अडवून चाकूचा धाक दाखविला जात असल्याच्या गंभीर घटनांनी खळबळ उडाली आहे. तोंडाला काळा मास्क बांधून फिरणारे ३ ते ५ जण केवळ मुलींनाच लक्ष्य करत असल्याचे समोर आले आहे.
या प्रकारामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात पंडित नेहरू विद्यालयाने साकोली पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली असून, पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
सानगडी हे परिसरातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र असून येथे इयत्ता पहिलीपासून पदवीपर्यंत शिक्षणाची सुविधा आहे. जवळपास १० ते १५ गावांतील सुमारे ३ हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी पायी, सायकलने, तर काही बसने येथे शिक्षणासाठी ये-जा करतात. बाहेरगावाहून जंगलमार्गे येणाऱ्या मुलींना अधिक धोका असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. गावाबाहेरील सुनसान रस्त्यांवर अशा घटना घडण्याची शक्यता अधिक असल्याने चिंता वाढली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे अज्ञात इसम चॉकलेटचे आमिष दाखवून ‘गाडीत बसा, ओरडायचे नाही’ असे म्हणत चाकू लावून धमकावत असल्याचे मुलींनीच सांगितले आहे. जि.प. प्राथमिक शाळा क्रमांक २ मधील वर्ग तिसरीच्या तीन मुली, पंडित नेहरू विद्यालयातील पाचवीच्या दोन मुली तसेच जि.प. हायस्कूलमधील पाचवीच्या एका मुलीसोबत हा थरार घडल्याची माहिती आहे. त्यामुळे हा प्रकार अफवा नसून प्रत्यक्ष घटनांवर आधारित असल्याचे स्पष्ट होत आहे.
या गंभीर प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सानगडी येथे पोलीस चौकी अस्तित्वात असूनही ती प्रत्यक्षात निष्क्रिय ठरत आहे. नियमानुसार पीएसआय, हेड कॉन्स्टेबल व कॉन्स्टेबलांची तैनाती असताना केवळ मनुष्यबळाच्या कारणावरून संपूर्ण चौकी साकोली येथे ड्युटीवर हलवली जाते, परिणामी सानगडी व परिसरातील १७ गावांचा सुरक्षा किल्लाच उघडा पडला आहे.
मुलींच्या सुरक्षिततेसारखा अतिसंवेदनशील विषय समोर असताना काही पालक तक्रार देण्यासाठी चौकीत गेले असता तिथे थेट कुलूप लावलेले आढळले, ही बाब प्रशासनाच्या उदासीनतेचे भयावह चित्र उभे करते. रात्री एखादी अनुचित घटना घडल्यास मदतीसाठी नागरिकांनी कुणाकडे धाव घ्यायची, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. पोलीस चौकी असूनही भीतीत जगावे लागत असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये तीव्र होत असून, पोलीस अधीक्षकांनी तातडीने या चौकीत नियमित कर्मचारी उपलब्ध करून देत गस्त वाढवावी व आरोपींचा शोध न घेतल्यास जनआक्रोश उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्या घडत असलेले प्रकरण अत्यंत संवेदनशील असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला आम्ही सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. शाळेतील मुला-मुलींना अनोळखी व्यक्तींपासून दूर राहण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. कोणतीही संशयास्पद अथवा अनैतिक कृती घडल्यास तात्काळ जोरात ओरडून आजूबाजूच्या लोकांचे लक्ष वेधण्यास सांगितले आहे. तसेच शाळेत येताना-जाताना एकटे न जाता गटाने प्रवास करण्याचे निर्देश दिले आहेत. या संपूर्ण घटनेची माहिती पोलिस प्रशासनाला कळवून आवश्यक कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
- प्राचार्य डी. ए. मेंढे, जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, सानगडी