

Lakhandoor Child Abuse Aase
भंडारा: लाखांदूर शहरात ५ वर्षीय चिमुकलीवर एका परप्रांतीयाकडून झालेल्या अतिप्रसंगाविरोधात शहर पेटून उठला आहे. या प्रसंगाविरोधात १५ डिसेंबररोजी सर्वधर्मीय नागरिकांकडून लाखांदूर बंदचे आयोजन करण्यात आले होते. बंदच्या सुरुवातीलाच शिवाजी टी पॉइंट येथे उपस्थित गर्दीला संबोधताना काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
लाखांदूर पोलिसांच्या मध्यस्तीने हा वाद संपुष्टात आणून पुढे या मोर्चाचे प्रस्थान झाले. त्यानंतर लाखांदूर तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. लाखांदूर शहरात ६ डिसेंबर रोजी अंगणात खेळत असलेल्या एका ५ वर्षीय चिमुकलीवर एका परप्रांतियाने अतिप्रसंग केला. त्याच्या विरोधात लाखांदूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
या घटनेच्या विरोधात लाखांदूर पेटून उठला. याच्या निषेधार्थ आणि काही मागण्या घेवून १५ डिसेंबर रोजी सर्वधर्मीय आणि सर्वपक्षीय लाखांदूर बंद आणि मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
विधिसंघर्ष आरोपी व त्याच्या कुटुंबियांना लाखांदूर तालुक्यातून हाकलण्यात यावे. यापूर्वी देखील त्याने केलेल्या गुन्ह्याच्या संबंधाने तपास करावा. पीडित व तिच्या कुटुंबायांना संरक्षण देण्यात यावे. विधिसंघर्ष आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याने पोलिसांनी त्याची जमानत होऊ देऊ नये, म्हणून जलदगती न्यायालयात सदर प्रकरण चालवावे. आरोपीच्या कुटुंबाचे रहिवासी, आधार व रेशन कार्ड हे बेकायदेशीर तयार करण्यात आले. ते तत्काळ रद्द करण्यात यावे.
ही कागदपत्रे तयार करुन देणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कार्यवाही करण्यात यावी. पीडित कुटुंबाला २५ लक्ष रुपयांची व शासकीय नोकरी देण्यात यावी. ज्या परप्रांतीयांचा लाखांदूरात वावर आहे. त्यांची मूळ रहिवासी व अन्य कागदपत्रे मागवून त्यांची माहिती पोलिस स्टेशनला अद्यावत ठेवावी, आदी मागण्यांचा समावेश आहे. या मोर्चात तालुक्यातील सर्व जातीधर्माचे, सर्व पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी सहभाग नोंदविला.