

Tumsar Bike Accident
भंडारा : तुमसर तालुक्यातील माडगी येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या बांधकामादरम्यान दुचाकी घसरून झालेल्या अपघातात चारगाव येथील होमगार्ड जवान गजानन मोहन तिजारे (वय ३८) यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी (दि.६) धनत्रयोदशीच्या रात्री ८.३० वाजताच्या सुमारास राइस मिलजवळ ही दुर्घटना घडली.
बांधकाम सुरू असलेल्या रस्त्यावर मातीच्या ढिगाऱ्यामुळे दुचाकी अडकल्याने तिजारे यांचा तोल गेला आणि ते खाली कोसळले. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ऐन दिवाळीत कुटुंबावर या घटनेने दुःखाचा डोंगर कोसळला. घरातील कर्त्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर मोठा आघात झाला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
माडगी परिसरात रस्त्याचे बांधकाम सुरू असून रस्त्यालगत मातीचे ढिगारे पडून आहेत. संबंधित ठिकाणावरून वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत. याचदरम्यान तिजारे यांची दुचाकी अडकल्याने अपघात घडल्याची माहिती आहे. रात्रीच्या वेळी बांधकामस्थळी वाहनचालकांना धोक्याची पूर्वसूचना देणारे फलक, बॅरिकेड्स, पुरेशी प्रकाशव्यवस्था आणि सुरक्षित पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले होते का, असा प्रश्न या दुर्घटनेनंतर उपस्थित झाला आहे.
रस्त्याचे बांधकाम सुरू असताना वाहनचालकांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करणे संबंधित यंत्रणेची जबाबदारी असते. कामाच्या ठिकाणी संभाव्य धोके स्पष्टपणे निदर्शनास आणून देणे, वाहतुकीसाठी सुरक्षित मार्ग निश्चित करणे आणि रात्रीच्या वेळी पुरेशी प्रकाशव्यवस्था ठेवणे आवश्यक आहे.
माडगी येथील अपघाताच्या पार्श्वभूमीवर या उपाययोजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली होती का, याची चौकशी होणे गरजेचे आहे. एका जवानाचा जीव गेल्यानंतर तरी बांधकामस्थळांवरील सुरक्षेच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले जाणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. याप्रकरणी कंत्राटदारावर कारवाईची मागणी होत आहे.