Leopard Attack Bhandara | ३०० मीटरपर्यंत बालकाला फरफटत नेले! आई-वडिलांसमोर बिबट्याचा हल्ला

लाखांदूर तालुक्यातील दोनाड गावाच्या शेतशिवारात दुर्दैवी घटनेने खळबळ
Leopard Attack
Leopard AttackPudhari
Published on: 
Updated on: 

भंडारा : आई-वडील शेतात कापणी केलेले धान गोळा करण्याच्या कामात व्यस्त असताना जवळच उभ्या असलेल्या पाच वर्षीय बालकावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला. बालकाला जबड्यात पकडून बिबट्याने सुमारे ३०० मीटरपर्यंत फरफटत नेले. या हल्ल्यात दोनाड येथील मोक्ष सचिन बुरडे या बालकाचा मृत्यू झाला. गुरुवारी (दि. ५ ) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील दोनाड गावाच्या शेतशिवारात ही दुर्दैवी घटना घडली.

दोनाड येथील बुरडे कुटुंबाची वैनगंगा नदीच्या घाट परिसरात काही एकर शेती आहे. यंदाच्या खरीप हंगामात या शेतात धानाची लागवड करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी धान कापणीचे काम पूर्ण झाले होते. गुरुवारी कापणी केलेले धान गोळा करण्यासाठी मोक्षचे आई-वडील आणि कुटुंबातील अन्य सदस्य शेतात गेले होते. त्यांच्यासोबत मोक्षही शेतात आला होता. शेतात धान गोळा करण्याचे काम सुरू असताना मोक्ष आई-वडिलांच्या जवळच उभा होता.

Leopard Attack
Bhandara Tiger Attack | लग्नाची हळद सुकण्यापूर्वीच वाघाच्या हल्ल्यात तरुण ठार

त्याचवेळी जंगलातून भटकत आलेल्या बिबट्याने अचानक त्याच्यावर झडप घातली. बालकाला जबड्यात पकडून बिबट्याने शेतातून सुमारे ३०० मीटर अंतरापर्यंत फरफटत नेले. हा प्रकार आई-वडील आणि अन्य नातेवाइकांच्या निदर्शनास येताच त्यांनी आरडाओरड केली. नागरिकांचा आवाज ऐकताच बिबट्याने बालकाला शेतात सोडून जंगलाच्या दिशेने पळ काढला. मात्र, या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मोक्षचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच लाखांदूर वनविभाग आणि पोलिस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चन्ने आणि ठाणेदार शिरीष भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक तुकाराम डावकोरे, चंदन जारवाल, शीघ्र बचाव पथकाचे सदस्य तसेच सहायक पोलिस निरीक्षक आशीष गंद्रे, पोलिस हवालदार राजेंद्र कुरुडकर, जयेश जवांजारकर, संतोष चव्हाण, पोलिस शिपाई ओंकार सपाटे, लंकेश राऊत आणि अन्य पोलिस कर्मचाºयांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. बालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.