

भंडारा: आमचे तलाव, आमचे पाणी आणि आमच्याच हक्कासाठी आम्हाला जीव द्यावा लागत असेल, तर आम्ही मागे हटणार नाही, असा संतप्त पवित्रा घेत लाखांदूर तालुक्यातील झरी येथील शेतकऱ्यांनी प्रशासनाविरुद्ध एल्गार पुकारला. झरी तलावातील पाणी इतर गावांना देण्यास विरोध करत, ग्रामस्थांनी थेट सामूहिक जलसमाधी घेण्याचा इशारा दिल्याने प्रशासनात खळबळ माजली आहे.
झरी येथील तलाव सुमारे १२५ ते १५० एकर जागेत पसरलेला आहे. ग्रामस्थांच्या दाव्यानुसार, ही जागा झरीतील शेतकऱ्यांची असून, त्यांनी स्वत:च्या परिश्रमातून हा तलाव निर्माण केला होता. वर्षानुवर्षे या पाण्याचा वापर झरीतील शेतीसाठीच होत होता. मात्र, २००४ पासून पाणी वाटप समितीने रोटेशन पद्धत लागू करून या तलावाचे पाणी मुर्झा, पारडी आणि रयतवाडी या गावांना देण्यास सुरुवात केली. त्यामुळे झरी येथील शेतकऱ्यांवर अन्याय झाला. झरीतील शेतकऱ्यांनी आता आरपारची लढाई लढण्याचे ठरवले आहे. प्रशासनाने जर जबरदस्तीने पाणी सोडण्याचा प्रयत्न केला, तर सर्व शेतकरी तलावात उतरून सामूहिक जलसमाधी घेतील, असा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे प्रशासनासमोर मोठे पेच निर्माण झाला असून, आता वरिष्ठ अधिकारी यावर काय तोडगा काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शेतकऱ्यांचे आरोप
रोटेशन पद्धतीमुळे मूळ मालक असलेल्या झरीतील शेतकºयांनाच पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. हक्काचे पाणी मिळत नसल्याने रब्बी आणि खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. वारंवार निवेदने देऊनही लघु पाटबंधारे विभाग (भंडारा) आणि लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे.
प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये संघर्ष
पाटबंधारे विभागाचे कर्मचारी दुसऱ्या गावांना पाणी सोडण्यासाठी तलावावर पोहोचले असता, ग्रामस्थांनी त्यांना कडाडून विरोध केला. आमच्या जमिनीवरील तलावातून पाण्याचा एक थेंबही बाहेर जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेत शेतकरी आक्रमक झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता, मात्र ग्रामस्थ आपल्या मागणीवर ठाम राहिल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.