

Bhandara Rain
भंडारा : गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सर्वदूर पावसाने जोरदार हजेरी लावली. ३८ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सततच्या पावसामुळे वैनगंगा नदीला पूर आला असून अनेक मार्ग बंद पडले आहेत. पूरस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी गोसेखुर्द धरणाचे सर्व ३३ वक्र दरवाजे उघडले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून ८ आणि ९ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मागील २४ तासांत जिल्ह्यात ११४.५० मिमी पाऊस पडला असून सर्व सातही तालुक्यातील ३८ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस तुमसर तालुक्यातील सिहोरा मंडळात २३१.५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक रस्ते बंद पडले असले तरी पर्यायी मार्ग असल्याने कोणत्याही गावांचा संपर्क तुटलेला नाही. ७४ घरांचे नुकसान झाले असून कुठेही जीवितहानीची नोंद झालेली नाही.
मुसळधार पावसामुळे तसेच हवामान विभागाच्या पूर्वसूचनेमुळे भंडारा जिल्ह्यात मंगळवारी ४० पैकी ३८ मंडळात अतिवृष्टी झाली आहे. सद्यस्थितीतदेखील मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे. अनेक रस्ते, मार्ग हे पुराच्या पाण्याने प्रभावित झाले असून जिल्ह्यातील १८ रस्ते हे पुरामुळे वाहतुकीस बंद करण्यात आले आहे. भंडारा जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये, याकरीता जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, शाळा व महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांना ८ जुलै व ९ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. असे आदेश जिल्हा व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी निर्गमित केले आहेत.
भंडारा ६९.४०
पवनी १५५.१०
तुमसर १४७.६०
मोहाडी ९९.३०
साकोली ७५.२०
लाखनी ८३.६०
लाखांदूर १६४.७०
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाला जोडणाऱ्या बावनथडी नदीच्या पुलावरील वाहतूक मंगळवारी सकाळपासून बंद करण्यात आली. त्यामुळे येथील आंतरराज्यीय वाहतूक ठप्प पडली. बावनथडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने हा निर्णय घेण्यात आला. सकाळपासून पुलाच्या दोन्ही बाजुला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पुलाच्या अलीकडे पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सततच्या पावसामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण झाली आहे. तुमसर तालुक्यातील तामसवाडी (भे) येथील गरोदर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यासाठी गेलेली रुग्णवाहिका रस्त्यातील चिखलात फसली. धक्का मारुनही रुग्णवाहिका बाहेर निघत नव्हती. अखेर ट्रॅक्टरच्या सहाय्याने रुग्णवाहिका बाहेर काढण्यात आली. चिखलामुळे रुग्णवाहिका गावात पोहचू शकत नसल्याने अखेर गरोदर महिलेलाच चिखलातून प्रवास करत रुग्णवाहिकेपर्यंत जावे लागते. त्यानंतर रुग्णवाहिकेतून महिलेला रुग्णालयात दाखल करावे लागले. या प्रकारामुळे रस्ता बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराविरोधात प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला.
भंडारा तालुक्यातील भंडारा ते कारधा (लहान पुल), खमारी ते माटोरा, पवनी तालुक्यातील सोनेगाव ते विरली, अड्याळ ते विरली, पिंपळगाव ते सोमनाळा, मेंढेगाव ते सातेपाट, बेटाळा ते पवनी, सोनेगाव ते विरली, तुमसर तालुक्यातील गोंदेखारी ते टेमनी, चुल्हाड ते सुकळी नकुल, कर्कापूर ते रेंगेपार, ककार्पूर ते पांजरा, तामसवाडी ते सीतेपार, सिलेगाव ते वाहनी, सुकळी ते रोहा, तामसवाडी ते येरली, उमरवाडा ते सीतेपार, येरली ते पीपरा, उमरवाडा ते तामसवाडी, तुमसर ते येरली, परसवाडा ते सिलेगाव, बपेरा ते बालाघाट (पुल), मोहाडी तालुक्यातील उसर्रा ते टाकला, डोंगरगाव ते कान्हळगाव (सी.), ताडगाव ते सिहरी, पिंपळगांव ते कान्हळगांव, अकोला ते वडेगाव, आंधळगांव ते आंधळगांव पेठ, भिकारखेडा ते विहीरगांव, दहेगाव ते रोहना, टांगा ते विहीरगांव, साकोली तालुक्यातील विर्शी ते उकारा, वांगी ते खोबा, लाखांदूर तालुक्यातील किन्ही ते मांढळ, धर्मापुरी ते बारव्हा, मानेगांव ते बोरगांव, बारव्हा ते बोथली हे मार्ग बंद झाले आहेत.