

भंडारा : विहिरीच्या लोखंडी रिंगजवळ भावासोबत खेळत असताना विहिरीतील पाण्यात पडून एका पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, ११ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता अड्याळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कातुर्ली गावात घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मुलीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.
अक्षरा अजित कांबळे (वय ५) असे मृत बालिकेचे नाव आहे. ती कातुर्ली गावातील रहिवासी होती. अक्षराचे पालक मंगळवारी सकाळी शेतात कामावर गेले होते. अक्षरा तिच्या तीन वर्षांचा भाऊ अक्षदसोबत खेळत होती.
विहिरीवरील लोखंडी रिंगशी खेळत असताना तिचा तोल गेला आणि ती विहिरीत पडली. जवळच्याच एका वृद्ध महिलेने घटनास्थळी धाव घेतली. या वृद्ध महिलेने आरडाओरड केली. यानंतर गावकरीही धावून आले. घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच अक्षरा बुडाली होती. गावक-यांनी अड्याळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी अक्षराचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.