

Bhandara Adyal forest poachers
भंडारा: जिल्ह्यातील अड्याळ वनपरिक्षेत्र कार्यालय व क्षेत्र सहाय्यक कार्यालय किटाडी अधिनस्त लाखनी तालुक्यातील किटाडी जंगलबिटात बारूद गोळ्याच्या सहाय्याने रानडुकराची शिकार केल्याचा प्रकार समोर आला आहे. शिकारीनंतर रानडुकराचे मांस विक्रीसाठी नेण्याची तयारी करीत असताना ७० किलो मांसासह चार शिकाऱ्यांना वन विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.
धर्मेंद्रसिंग गोविंदासी टाक ( ५२वर्ष ), जालिंदरसिंग नेपालसिंग टाक (४० वर्ष), बलदेवसिंग धर्मेंद्रसिंग टाक (२३ वर्ष), लक्ष सतीश अहिरवार (१६ वर्ष), सर्व रा.अर्जुनी (मोरगाव), जि. गोंदिया अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
किटाडी जंगल बिटात मंगळवारी वन विकास महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी मांसभक्षी जनावरांचे पदचिन्ह सर्वेक्षणाचे काम करीत असताना चार संशयित इसम आढळून आले. त्यांची कसून चौकशी केली असता बारूदगोळ्याच्या साहाय्याने रानडुकरांची शिकार केल्याचे सांगितले. त्यांच्याजवळून ७० किलो रानडुकराच्या मांसासह शिकारीसाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाड, दोन मोटरसायकल, एक काता, दोन सुरी जप्त केल्या.
आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. ही कारवाई लाखनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर शिंपले, वनरक्षक गोपीचंद डोये, बीटरक्षक अमित वाघाये, वनपाल राहुल लोणारे, नागेश सिंगारपुतळे, चंद्रकांत मोरे, राजेश माटे यांच्यासह वन मजुरांच्या उपस्थितीत करण्यात आली.
किटाडी गावालगतचा बराचसा परिसर हा जंगलव्याप्त असून त्यात अनेक जंगली श्वापदे आढळतात. अलीकडे काही भागामध्ये रानडुकरांसह छोट्या प्राण्यांच्या शिकारीचे प्रमाण वाढले आहे. याकडे वन विभागाचे दुर्लक्ष झाल्याने वन्य प्राण्यांचे जीवन धोक्यात आले आहे. येथील जंगलांमध्ये पट्टेदार वाघासह बिबट, गवा, तरस, लांडगे, रानडुक्कर, भेकर, ससे,सांळीदर असे अनेक वन्यजीव तसेच प्राणी आढळून येतात.