

Bhandara District Flood
भंडारा : जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या धुवांधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुराचे पाणी सखल भागातील वस्त्यांमध्ये, गावांमध्ये शिरल्याने बिकट स्थिती झाली आहे. बचावासाठी पूरग्रस्तांनी घराच्या वरच्या माळ्यावर, समाजमंदिरात तर काही जणांनी नातेवाईकांकडे आश्रय घेतला आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एसडीआरएफ, डीडीआरएफ आणि होमगार्ड असे ६ बचाव पथक तैनात करण्यात आले आहे.
पुराचे पाणी घरात शिरल्याने शेकडो कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. भंडारा तालुक्यातील कारधा, भंडारा शहर, गणेशपूर, भोजापूर, जमनी, कोंढी (जवाहरनगर), पवनी तालुक्यातील पवना खुर्द, तुमसर तालुक्यातील चारगाव, ब्राम्हणी आणि लाखांदूर तालुक्यातील चिचगाव या गावातील बाधीत कुटुंबांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने त्यांना सुरक्षित अशा घराच्या वरच्या माळ्यावर, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये, समाजमंदिरात आणि नातेवाईकांच्या घरी हलविण्यात आले आहे. एकट्या जमनी या गावातील ५० कुटुंबांना स्थलांतरीत करण्यात आले. तर १० कुटुंबांना दाभा येथील ग्रामपंचायत भवनात हलविण्यात आले. संततधार पावसामुळे आतापर्यंत २२२ घरांचे नुकसान झाले असून कुठेही मनुष्य वा पशुहानीची नोंद झालेली नाही.
भंडारा जिल्ह्यात रविवारपासून जोरदार पाऊस बरसत आहे. सलग तीन दिवसांच्या पावसामुळे नदीनाल्यांना पूर आला आहे. सतत दोन दिवस अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. आज सर्वाधिक पावसाची नोंद लाखनी तालुक्यातील मुरमाडी तुप या मंडळात १७२.५० मि.मी. करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण ८० रस्ते पुराच्या पाण्यामुळे बंद झाली आहे. या गावांना पर्यायी मार्ग असल्याने गावांचा संपर्क तुटलेला नाही.
सततच्या पावसामुळे भंडारा शहरानजिकच्या भोजापूर येथे काही कुटुंब पुराच्या पाण्यात अडकले होते. बचाव पथकाने तात्काळ धाव घेत या कुटुंबांना बोटीच्या सहाय्याने सुरस्थितस्थळी हलविले. भोजापूर येथील काही भाग पूरग्रस्त असूनही बाधित कुटुंबांचे पूनर्वसन करण्याची मागणी सातत्याने केली जाते. परंतु, त्यांचे पूनर्वसन होत नसल्याने दरवर्षी आम्हाला पूराचा सामना करावा लागतो, अशी संतप्त प्रतिक्रीया बाधीत कुटुंबांनी व्यक्त केली.
पावसाचा जोर वाढत असल्यामुळे वैनगंगा नदीची पाणीपातळी सतत वाढत आहे. पूरस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी गोसेखुर्द धरणाचे सर्व ३३ दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येत आहे. सध्या गोसेखुर्द धरणातून १५ हजार क्युमेक्सपेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पावसाचा जोर वाढल्यामुळे भोजापूर येथील रस्त्यावरील पूल आज सकाळी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. भोजापूर कॅनल मार्गावरील व्यंकटेश नगर फेज १ ही नवीन कॉलनी खात मार्गावर बांधण्यात आली. जानेवारी महिन्यात बांधकाम करण्यात आलेला या रस्त्यावरील पूल आज वाहून गेला. या पुलाच्या जवळच असलेल्या नाल्यातील पाणी ओसंडून वाहत आहे. या पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे रस्त्यावरील निकृष्ट बांधकाम केलेला पूल खचला आणि प्रवाहात वाहत गेला. पूल वाहून गेल्यामुळे रस्त्याचे दोन भागात विभाजन झाले आहे. पाण्याच्या प्रवाहात रस्ताही वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात सुरू असलेली अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागप्रमुखांनी पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी दिले आहेत. सर्व उपविभागीय अधिकारी यांचे उपविभाग, तालुका व ग्रामस्तरीय आपत्ती व्यवस्थापन सनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. क्षेत्रीय स्तरावरील सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांचे मुख्यालयात निवासी राहावे, असेही आदेशात नमूद आहे.