

भंडारा : शहरातील नव्याने निर्माणाधीन असलेल्या बाह्य वळण (बायपास) महामार्गावर सोमवारी,(दि.30 जून ) रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. पावसामुळे रस्ता ओलसर झाल्याने चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकीने प्रथम बॅरिकेटला, त्यानंतर रस्त्यावर उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली.
या अपघातात सोनू पांडुरंग पालवे (23) आणि मृणाल दत्तात्रय मानवटकर (25) रा. साकोली या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हे दोघेही नागपूरहून साकोलीच्या दिशेने जात होते. महामार्गाच्या कामामुळे कन्स्ट्रक्शन कंपनीचा ट्रक रस्त्यावर उभा होता. मात्र, त्या ट्रकभोवती कोणतेही सूचनाफलक, चेतावणी दिवे किंवा प्रतिबंधक चिन्हे लावलेली नव्हती, असा आरोप नागरिकांनी केला.
पावसामुळे रस्त्यावर घसरटपणा निर्माण झाला होता. अंधारामुळे दुचाकी ट्रकच्या दिशेने घसरली आणि अपघात घडला. या घटनेनंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली. भंडारा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
भंडारा पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रक ताब्यात घेतला असून, कन्स्ट्रक्शन कंपनीच्या निष्काळजीपणाबाबत अधिक तपास सुरू आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांत संतापाचे वातावरण असून, महामार्गाच्या कामासाठी असलेल्या सुरक्षा उपाययोजनांच्या अभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी महामार्ग प्राधिकरण आणि कंत्राटदार कंपन्यांनी आवश्यक खबरदारी घेणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.