

भंडारा, पुढारी वृत्तसेवा : आई-वडीलांसोबत शेतात गेलेल्या ४ वर्षीय बालकाचा कालव्यात पडून अंत झाला. ही घटना बेरोडी गावालगत बुधवारी (दि. १७) दुपारी १ वाजता घडली. श्रेयांश शिवराम गायधने (रा. बेरोडी पुनर्वसन) असे मृतक बालकाचे नाव आहे.
करचखेडा उपसा सिंचन योजनेचा कालवा बेरोडी पुनर्वसन गावाजवळून गेलेला आहे. गावातून कालव्यात पाईप टाकण्यात आले. पाईपमधील पाणी टाकीत पडून पुढे कालव्यात जातो. काही दिवसाअगोदर कालव्याला पाणी सोडण्यात आले होते. सिंचनाची सोय झाल्याने शिवराम गायधने या शेतकऱ्यांनी धान रोवणीला प्रारंभ केला. धान रोवणीचे काम असल्याने चार वर्षीय बालक श्रेयांश हा आई-वडीलांसोबत शेतात गेला होता. रोवणीचे काम सुरु असताना खेळता खेळता श्रेयांश कालव्याकडे गेला. अचानक कालव्यात असलेल्या टाकीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला.
श्रेयांश हा नर्सरीमध्ये शिकत होता. घटना उघडकीस येताच गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली होती. माहिती मिळताच कारधाचे पोलिस उपनिरीक्षक अरविंद मोहोड, पोलिस शिपाई प्रदिप गडदे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच मृतदेह शवविच्छेदनाकरीता पाठविले. श्रेयांशच्या मृत्यूपश्चात आई-वडील, एक बहिण असा परिवार आहे.