Tiger Attacks : मोहफूल गोळा करायला गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार | पुढारी

Tiger Attacks : मोहफूल गोळा करायला गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : पवनी तालुक्यातील कन्हाळगाव येथे मोहफूल गोळा करायला जंगलात गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार झाली. सोमवारी २५ मार्च रोजी पहाटे ही घटना उघडकीस आली. सिताबाई श्रावण डडमल (वय ६०, रा. कन्हाळगाव) असे मृत महिलेचे नाव आहे.

सिताबाई डडमल या चन्नेवाडा कक्ष क्र. ३१६ मध्ये पहाटेच्या सुमारास मोहफुल गोळा करायला गेल्या होत्या. दुपार पर्यंत घरी परत न आल्यामुळे घरातील व्यक्तींनी शोधाशोध केली. गावातील स्मशानभूमीपासून पाचशे मीटरवर जंगलात मृत अवस्थेत त्या आढळून आल्या. सदर घटनेची माहिती वन विभाग व पोलीस विभागाला देण्यात आली. घटनास्थळी गावकऱ्यांनी मृतदेह उचलण्यास मज्जाव केल्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी गावकऱ्यांची समजूत काढून मृतदेह शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय पवनी येथे आणला. यावेळी गावकऱ्यांनी वाघाला जेरबंद करून इतरत्र सोडण्यात यावे, अशी मागणी केली.

मृतकाचे कुटूंबियास आर्थिक मदत म्हणून वनविभागाकडून चेकद्वारे दहा लाख रुपये देण्यात आले. तर उर्वरित पंधरा लाख रुपये लवकरच फिक्स डिपॉझिटच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. भंडाराचे उपवनसंरक्षक राहुल गवई, सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख, वनक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) व्ही. के. नागदेवे, वनक्षेत्र अधिकारी (अभयारण्य) लहू ढोकळ यांनी घटनास्थळाला भेट दिली.

हेही वाचा : 

Back to top button