Bhandara News : वाळू तस्करांवर पहिल्यांदाच ‘एमपीएडी’अंतर्गत कारवाई; वाळू माफियांचे धाबे दणाणले

Bhandara News : वाळू तस्करांवर पहिल्यांदाच ‘एमपीएडी’अंतर्गत कारवाई; वाळू माफियांचे धाबे दणाणले

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : भंडारा जिल्ह्यात वाळू तस्करांचा धुमाकूळ चांगलाच वाढला आहे. अशा वाळू तस्करांना अद्दल घडविण्यासाठी पोलिसांनी एमपीएडी कायद्यान्वये दोन वाळू तस्करांवर कारवाई करुन त्यांची थेट कारागृहात रवानगी केली. या कायद्यान्वये वाळू माफियांवर केलेली जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई असून वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे. Bhandara News

पंकज फेकनलाल काटेखाये (वय २८) आणि क्रिष्णा रमेश काटेखाये (वय २३, दोघेही रा. खातखेडा, ता. पवनी) अशी आरोपींची नावे आहेत. ते अट्टल वाळू तस्कर असून वैनगंगा नदीपात्रातून वाळूचा उपसा करून तस्करी करत होते. वाळूचा उपसा करून विनापास परवाना तस्करी करून चोरी करणे हेच त्यांचे उपजीविकेचे साधन होते. कमी श्रमातून पैसा मिळाल्याने त्या पैशाच्या जोरावर त्यांनी अनेक गुंडांनाही पोसले आहे. अशा गुंडामार्फत व स्वत: परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना धमकावून दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. Bhandara News

वाळूची चोरटी वाहतूक करीत असताना शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कारवाईकरीता थांबविल्यास त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर कारवाई करण्याकरीता कोणतेही शासकीय अधिकारी व कर्मचारी समोर धजावत नव्हते. एवढेच नव्हे, तर गावकऱ्यांनी पोलिसांकडे अथवा तहसील कार्यालयात तक्रार केल्यास त्यांना धाक दाखवून शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देत होते.

जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सदर बाबी विचारात घेऊन पंकज फेकनलाल काटेखाये आणि क्रिष्णा रमेश काटेखाये यांच्यावर एमपीएडी कायद्यानुसार (महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती, वाळू तस्कर व अत्यावश्यक वस्तुंचा काळा बाजार करणारे व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना प्रतिबंध करण्याविषयीचा कायदा) भंडारा जिल्हा कारागृहात रवानगी केली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक लोहित मतानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, पवनीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिडाम यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीनकुमार चिंचोळकर, पवनीचे पोलीस निरीक्षक नरेंद्र निस्वादे, राजेश पंचबुधे, अजय बारापात्रे, अंकोश पुराम, अजित वाहणे यांनी केली.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news