

भंडारा, पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता सुमेध शामकुवर याला अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर फरार झालेला श्यामकुवर याला अखेर २३ दिवसानंतर अटक करण्यात आंधळगाव पोलिसांना यश आले आहे.
भंडारा शहरातील राजीव गांधी चौकात खासगी संस्थेचे वसतीगृह आहे. या संस्थेचा सुमेध श्यामकुवर संचालक आहे. सदर विद्यार्थिनी काही दिवसांपूर्वी गावी गेली होती. २५ फेब्रुवारी रोजी श्यामकुवर याने विद्यार्थिनीच्या वडिलांना फोन केला. मुलीला घ्यायला आल्याचे त्याने वडिलांना सांगितले. खुद्द संचालक घ्यायला आल्याने वडिलांनी विश्वास ठेऊन श्यामकुंवर याच्या चारचाकी वाहनात तिला पाठवून दिले.
भंडाराकडे येत असताना डोंगरगाव ते विहिरगाव मार्गावरील एका निर्जन ठिकाणी श्यामकुंवर याने चारचाकी गाडी थांबविली. तिथे तिचा विनयभंग केला. त्यानंतर दोघेही वसतीगृहात आले. हा प्रकार विद्यार्थिनीने आपल्या मैत्रिणीला सांगितला. मैत्रिणीने विद्यार्थिनीच्या वडिलांना याबाबत माहिती दिली. वडिलांनी आंधळगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तेव्हापासून शामकुंवर फरार होता. अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
कोंढी (जवाहरनगर) येथील सुमेध श्यामकुवर हा भंडारा जिल्हा परिषदेचा माजी अध्यक्ष आहे. तो राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता आहे. विशेष म्हणजे अश्लील शिवीगाळ प्रकरणी मोहाडीचे राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता राष्ट्रवादीच्या दुसऱ्या नेत्याला विनयभंगप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
हेही वाचलंत का ?
पाहा व्हिडिओ :